कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकात्यामध्ये अभूतपूर्व परिस्थिती पाहायला मिळाली. कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांची मुक्तता करण्यात आली आहे. कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी हे सीबीआय अधिकारी छापा टाकायला गेले होते.  कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी छापा टाकायला गेलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. शारदा चिट फंड गैरव्यवहाराची चौकशी करताना केंद्र आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये जोरदार संघर्ष पेटला आहे.




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी चिटफंड प्रकरणी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमधला वाद आणखी चिघळणार आहे. कोलकाता पोलिस आयुक्तांच्या घरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महापौर फिरहाद हकीम यांच्यामध्ये चर्चा झाली. दरम्यान, कोलकाता पोलिसांनी सीबीआयच्या कार्यालयाला वेढा घातला होता. त्याठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 


दरम्यान याप्रकरणानंतर ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप पश्चिम बंगालला त्रास देत आहे. ब्रिगेड रॅली केल्यामुळे त्यांना बंगालला उद्धवस्त करायचं आहे. काल मोदींनी केलेलं भाषण म्हणजे धमकी होती, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केला आहे. कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार हे जगात सर्वोत्तम असल्याचं मत ममतांनी व्यक्त केलं. 


यंत्रणांना सुरक्षा पुरवणं ही माझी जबाबदारी आहे. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. आज मला खूप वाईट वाटत आहे. संघराज्याच्या ढाच्यावर घाला घालण्याचा हा प्रकार आहे, असं वक्तव्य ममता बॅनर्जींनी केलं आहे. कोणतीही नोटीस न देता सीबीआयचे अधिकारी कोलकाता पोलीस आयुक्तांच्या घरी येतात. आम्ही त्यांना अटक करू शकलो असतो, पण त्यांना सोडून देण्याची भूमिका आम्ही घेतल्याचं ममता म्हणाल्या.