MHA Seeks Report On West Bengal Violence: पश्चिम बंगालमध्ये रामनवमी आणि त्यानंतरच्या दिवसांमध्ये झालेल्या हिंसाचारावरुन (West Bengal Violence) राज्यात सत्तेत असलेला तृणमूल काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासूनच चांगलेच तापले असून दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप केले जात आहेत. याच दरम्यान आता केंद्र सरकारनेही या प्रकरणाची दखल घेतली असून या प्रकरणात केंद्र कठोर भूमिका घेण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भातील अहवाल राज्य सरकाकडून मागवला आहे. राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेला हिंसाचार आणि राज्यातील चिंताजनक कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती यासंदर्भात भाजपाचे राज्यातील अध्यक्ष सुकांतो मजूमदार यांनी गृहमंत्री अमित शाहांना चिठ्ठी लिहिली होती. यानंतरच केंद्राने तातडीने यात लक्ष घालून राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे.


दोन गटांमध्ये हिंसक झटापट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम बंगालमधील पोलिसांनी कलम 144 चा संदर्भ देत मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी भाजपाचे बंगाल प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार यांना हुगळी जिल्ह्यातील दंगलग्रस्त भागात जाण्यापासून रोखलं. अनेक ठिकाणी सीआरपीएफचं कलम 144 लागू करण्यात आलं आहे. रविवारी झालेल्या रामनवमीच्या दिवशी या ठिकाणी शोभायात्रेदरम्यान दोन गटांमध्ये हिंसक झटापट झाली होती. 



कलम 144 चं उल्लंघन केल्याचा आरोप


टीएमसीकडून भाजपावर कलम 144 च्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र भाजपाने हा आरोप फेटाळून लावला आहे. मजूमदार यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण देताना, "आम्ही कलम 144 तोडलेलं नाही. आम्ही पोलिसांकडे विनंती केली आहे की मला आणि आमच्या पक्षाचे खासदार ज्योतिर्मय सिंह महतो यांना तिथे जाण्याची परवानगी द्यावी. मात्र मला परवानगी दिली जात नाहीय कारण सत्य लपवायचं आहे," असं म्हटलंय.



हिंसा झालेल्या प्रांतात केंद्रीय सुरक्षा दलांना तैनात केलं जावं अशीही मजूमदार यांची मागणी आहे. तसेच या हिंसाचाराचा एनआयएच्या माध्यमातून तपास करावा अशीही मागणी केली जात आहे. राज्यातील पोलिसांना हिंसाचार रोखण्यामध्ये पूर्णपणे अपयश आलं असा आरोपही मजूमदार यांनी केला आहे. सोमवारी मजूमदार यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्षांना हुगळी जिल्ह्यामध्ये हिसाचार प्रभावित रिसडा परिसरामध्ये प्रवेश करण्यापासून रोखलं होतं.



तृणमूलचा हल्लाबोल


मजूमदार यांनी केलेल्या आरोपांना तृणमूल काँग्रेसनेही उत्तर दिलं आहे. तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी भाजपाकडूनच उपद्रव निर्माण केला जात असल्याचं म्हटलं आहे. "राज्यामधील सांप्रदायिक सद्भावना आणि शांतता भंग करायचा भाजपाचा प्रयत्न आहे. पोलिसांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतात तेव्हाच भाजपा का गोंधळ घालते? शांततेच्या मुद्द्यावरुन भाजपाला मतं मिळवायची आहेत," असं घोष म्हणाले.