नवी दिल्ली: कोरोना व्हायरसच्या (COVID 19) प्रादुर्भावामुळे जग ठप्प झाले असले तरी निसर्गात आणि समाजात काही सकारात्मक बदलही घडताना दिसत आहेत. एअर इंडियाबाबतही नुकताच असाच एक किस्सा घडला. एरवी भारत आणि पाकिस्तानमधून विस्तवही जात नाही. मात्र, कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात अविरतपणे कार्य करणाऱ्या एअर इंडियाच्या कार्याला पाकिस्तानने सलाम केला आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियाने जर्मनीतील फ्रँकफर्टसाठी विशेष उड्डाणे सुरु केली आहेत. या विमानांमधून मदत साहित्य आणि भारतात अडकलेल्या युरोपियन नागरिकांना जर्मनीत पोहोचवण्याचे काम सुरु आहे. 
या विमानांमध्ये वरिष्ठ वैमानिक असणाऱ्या एका अधिकाऱ्याने 'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलताना एक किस्सा सांगितला. पाकिस्तानच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने (ATC) एअर इंडियाचे कौतुक करण्यात आले.


मोदीजी, अमेरिकेसाठी एवढं करा, डोनाल्ड ट्रम्प यांची विनंती

आमच्या विमानाने पाकिस्तानच्या हवाई माहिती क्षेत्रात (FIR) प्रवेश केल्यानंतर कराची ATC ने 'अस्सलाम वालेकुम' बोलत आमचे स्वागत केले. आम्ही कराची नियंत्र कक्षातून बोलत आहोत. कन्फर्म करा, आपण मदत सामग्रीसह फ्रँकफर्टला जात आहात?, असा प्रश्न ATC ने एअर इंडियाच्या विमानाला विचारला. त्यावर भारतीय वैमानिकाने होय उत्तर दिले. यानंतर पाकिस्तानच्या हवाई वाहतूक कक्षाकडून एअर इंडियाच्या विमानाला आवश्यक सूचना देण्यात आल्या. हे सर्व सोपस्कार आटोपल्यानंतर पाकिस्तानच्या हवाई कक्षाने, ' कोरोनासारख्या संकटाच्या काळातही तुम्ही विमाने चालवत आहात, याचा आम्हाला अभिमान  आहे', असे म्हटले. भारतीय वैमानिकानेही या कौतुकाबद्दल पाकिस्तानचे आभार मानले. 

विशेष म्हणजे यानंतर इराणनेही आपल्या हवाई हद्दीतून एअर इंडियाला तब्बल १००० किलोमीटरपर्यंतचा प्रवास करून दिला. आंतरराष्ट्रीय तणावामुळे इराणच्या हवाई हद्दीत इतर देशांच्या विमानांना प्रवेश करण्यास निर्बंध आहेत. मात्र, माझ्या आजपर्यंतच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच इराणच्या हवाई हद्दीतून मी विमान उडवले, अशी माहिती एअर इंडियाच्या वैमानिकाने दिली.