नक्की त्या हेलिकॉप्टरचं काय झालं?; प्रत्यक्षदर्शीने केला `हा` दावा!
प्रत्यक्षदर्शी कृष्ण स्वामी यांनी या दुर्घटनेची माहिती दिलीये.
कून्नूर : 'ते हेलिकॉप्टर खाली येत होतं....आणि अचानक एक मोठा आवाज झाला...हे हेलिकॉप्टर झाडाला आदळलं आणि क्षणार्धात त्याने पेट घेतला...' हेलिकॉप्टर दुर्घटना उघड्या डोळ्यांनी पाहणारे प्रत्यक्षदर्शी कृष्ण स्वामी या घटनेची माहिती देत होते. कृष्ण स्वामी यांच्या डोळ्यासमोरून अजूनही दुर्घटनेचा थरार जात नाहीये.
भारताचे CDS जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांचं बुधवारी हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. भारतीय वायुसेनेने सांगितलं की, लष्करी हेलिकॉप्टरमध्ये 14 जण होते, त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला. जनरल रावत यांच्या पत्नीही या अपघाताचा बळी ठरल्या.
या दुर्घटनेचे प्रत्यक्षदर्शी कृष्ण स्वामी यांनी एका न्यूज चॅनलशी बोलताना म्हणाले, "मी घरी जात असताना या हेलिकॉप्टरला पाहिलं. ते खाली येत होतं. हेलिकॉप्टर झाडाला आदळलं आणि आगीने पेट घेतला."
ते पुढे म्हणाले, "जमिनीवर पडण्यापूर्वी ते दुसऱ्या एका मोठ्या झाडावर आदळलं. यानंतर धूर आणि आणि आग दिसू लागली. मी माझ्या शेजारच्या मुलाला हाक मारली. यानंतर त्यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना पाचारण केलं. हेलिकॉप्टरने पेट घेतल्याने 2-3 लोकांना खाली पडलेलं मी पाहिलं. या व्यक्ती आगीच्या कचाट्यात सापडले होते."
हवाई दलाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या हेलिकॉप्टर दुर्घटनेतून ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे एकमेव बचावले आहेत. ग्रुप कॅप्टन वरुण सिंग (Gp Capt Varun Singh) यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ग्रुप कॅप्टन वरुण सिंग (Gp Capt Varun Singh) यांचा स्वातंत्र्य दिनी शौर्य चक्राने (Shaurya Chakra) सन्मान करण्यात आला होता. 2020 मध्ये हवाई आपत्कालीन परिस्थितीत एलसीए तेजस लढाऊ विमान वाचवल्याबद्दल त्यांना हा सन्मान प्राप्त झाला. भारतीय वायुसेनेने दिलेल्या माहितीनुसार, ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर सध्या वेलिंग्टन इथल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.