मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. कोरोनाची दुसरी लाट अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा लोकांचा बळी घेत आहे. जगभरात पुन्हा एकदा संक्रमण वाढू लागले आहे. त्यामुळेच फ्रान्स (France) आणि आता इंग्लंडने देखील पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. ब्रिटेनमध्ये लॉकडाउन-2 ची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर आता भारतात देखील लॉकडाऊन होणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात देखील कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी इशारा दिला होता की, भारतात देखील कोरोनाची दुसरी लाट येत आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर न पडणं आणि बाहेर पडल्यानंतर मास्क लावणं महत्त्वाचं आहे. देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची वाढ होण्याची शक्यता आहे. लोकांचा निष्काळजीपणा आणि प्रदूषण यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचं संक्रमण होण्याची चिन्ह आहेत. लोकांनी जर निष्काळजीपणा सोडला नाही तर येणाऱ्या काळात मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. पंतप्रधान मोदी यांनी देखील जोपर्यंत लस नाही तोपर्यंत निष्काळजीपणा नको असं आवाहन केलं आहे.


भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 46,964 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशात कोरोना संक्रमितांची संख्या 81,84,083 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 470 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यांचा आकडा 1,22,111 वर पोहोचला आहे. देशात अजूनही  कोरोनाचे 5,70,458 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत 74,91,513 जण बरे झाले आहेत. भारतात देखील कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.


ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी देशात दुसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 5 नोव्हेंबरपासून हा लॉकडाऊन सुरु होणार आहे. 2 डिसेंबरपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. जॉनसन यांनी लॉकडाऊन दरम्यान घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. 2 डिसेंबरनंतर परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल.


यूरोपमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने फ्रान्सने देखील गुरुवारी रात्रीपासून लॉकडाऊनची घोषणा केली होती.