ITR Filing Update: 31 जुलैनंतरही ITR फाईल करु शकता, कोणाला मिळते ही सुविधा? कधीपर्यंत आहे डेडलाईन?
ITR Filing Update : तुम्ही आयकर परतावा भरला आहे का? नाही तर अजून 8 दिवस बाकी आहेत. दरम्यान असे काही करदाते आहेत ज्यांना आयकर विभाग आयटीआर दाखल करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत वेळ देतो.
ITR Filing Update: करदात्यांसाठी दरवर्षी आयकर परतावा दाखल करणं म्हणजे एक मोठी डोकेदुखीच असते. दरम्यान, आयटीआर दाखल करण्यासाठी 31 जुलैची अंतिम मुदत आहे. सर्व करदात्यांना 31 जुलैपर्यंत कोणत्याही स्थितीत आयकर परतावा भरावा लागणार आहे. मुदत संपण्यासाठी आता फक्त 8 दिवस शिल्लक राहिले आहेत. जर तुम्ही आयकर परतावा भरण्यात असमर्थ ठरलात तर तुम्हाला दंड आणि व्याज भरावं लागू शकतं. पण तुम्हाला माहिती आहे का, आयकर विभाग काही करदात्यांना 31 जुलैनंतरही परतावा भरण्याची परवानगी देतं. अशा करदात्यांसाठी वेगळी डेडलाईन ठरवली जाते.
तुम्हाला आधीच कल्पना असेल की, आर्थिक वर्ष 2023-24 साठी आयकर परतावा भरणं 1 एप्रिलपासून सुरू झालं आहे. नोकरदार, पगारी आणि निवृत्तीवेतन प्राप्त करणाऱ्या व्यक्ती, एचयूएफ आणि अशी खाती पुस्तकं ज्यांना ऑडिटची आवश्यकता नाही त्यांना आयकर परतावा भरण्यासाठी 31 जुलै अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे. परंतु, असे काही करदाते आहेत ज्यांना या मुदतीनंतरही आयकर परतावा भरण्याची सुविधा मिळते. आयकर विभागाने या करदात्यांना आणखी 3 महिन्यांचा वेळ दिला आहे.
31 ऑक्टोबरची डेडलाईन
असे उद्योगपती ज्यांच्या खात्यांचं ऑडिट करणं आवश्यक आहे ते 31 ऑक्टोबरपर्यंत त्यांचा आयकर परतावा भरु शकतात. आयकर विभाग या व्यावसायिकांना 3 महिन्यांचा अधिक वेळ देतो, जेणेकरून ते त्यांच्या खात्यांचे एखाद्या मान्यताप्राप्त सीएकडून ऑडिट करून घेतील आणि नंतर त्यांचा आयकर परतावा दाखल करू शकतील. जर त्यांचं असं एखादं खातं असेल ज्यासाठी ऑडिट आवश्यक असेल तर त्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे.
30 नोव्हेंबरपर्यंतही भरु शकता आयकर परतावा
आयकर विभाग काही प्रकारच्या व्यवहारांसाठीही आयटीआर भरण्यात सूट देतो. एखाद्या व्यवसायाला त्याच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांमधील हस्तांतरण किंमतीचा अहवाल भरण्याची आवश्यकता असल्यास, अशा व्यवसायांना 30 तारखेपर्यंत त्यांचा आयटीआर भरण्याची परवानगी आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारांव्यतिरिक्त, त्यात विशिष्ट प्रकारचे देशांतर्गत व्यवहार देखील समाविष्ट आहेत.
31 मार्चपर्यंत सुविधा
आयकर विभागाने आयटीआर भरण्याबाबत करदात्यांना अधिक सूट दिली आहे. जर एखाद्याला सुधारित आयटीआर भरायचा असेल तर त्याला 31 डिसेंबरपर्यंत वेळ मिळेल. याशिवाय उशिरा रिटर्न भरणाऱ्यांनाही 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, अशा करदात्यांना दंड, व्याज आणि विलंब शुल्कही भरावे लागणार आहे. तुम्हाला अपडेटेड आयकर परतावा भरायचा असल्यास, ते करण्यासाठी तुमच्याकडे 31 मार्च 2027 पर्यंत वेळ आहे. अपडेटेड रिटर्न फाइल करण्यासाठी तुम्ही ज्या मूल्यांकन वर्षात आयटीआर भरला आहे त्या वर्षाच्या पुढे तुम्हाला 2 वर्षांपर्यंतचा वेळ मिळेल.