रेल्वेसारखं विमानातही लहानग्यांना मोफत प्रवास असतो का? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर
Air Fare for Children: लहान मुलांसोबत विमानाने प्रवास करत असताना किती वर्षांपर्यंतच्या मुलांसोबत विमान प्रवास करु शकता याची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घ्या
Air Fare for Children: मार्च -एप्रिलमध्ये परीक्षा संपून शाळांना सुट्ट्या सुरू होतील. या सुट्टीत मुलांना घेऊन फिरायला जाण्याचे प्लान आखताय. मुलांना बाहेर फिरायला नेण्याआधी त्या ठिकाणाची सगळी माहिती घेताच. रेल्वे किंवा बसने जात असाल तर लहान मुलांना प्रवास मोफत असतो. मात्र, विमान प्रवास करताना लहान मुलांचे पैसे भरावे लागतात. विमान प्रवासासाठी लहान मुलांचे किती पैसे भरावे लागतात आणि काय नियम असतात हे जाणून घेऊया.
प्रवासात जास्त वेळ जाऊ नये आणि प्रवासही सुखाचा व्हावा यासाठी विमान प्रवासाचा मार्ग निवडतात. तसंच, मुलंसोबत असल्याने विमान प्रवासच आरामदायक ठरतो. पण लहान मुलांसोबत विमान प्रवास करताना व तिकिटांचे बुकिंग करताना काय काळजी घ्यावी. तसंच, तिकिट कॅन्सल केल्यास किती पैसे रिफंड मिळतात याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
लहान मुलांच्या तिकिटाबाबत विमान कंपन्यांचे वेगवेगळे नियम आहेत. विमान प्रवासाच्या नियम व अटी निराळ्या आहेत. विमान तिकिट बुक करताना Children असा वेगळा विभाग असला तरी 2 ते 12 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या तिकिटांचे पूर्ण पैसे भरावे लागतात. तर तीन दिवस ते दोन वर्षापर्यंतच्या नवजात बालकाला प्रौढ व्यक्तिच्या तिकिटानुसार 10 टक्के दर आकारला जातो. त्यानुसार देशातंर्गत प्रवासासाठी 1500 रूपये तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 2,350 रूपये मोजावे लागतात.
किती दिवसाच्या बाळाला घेऊन प्रवास करु शकता?
बाळाला घेऊन विमान प्रवास करत असताना बाळाचे वय सात दिवसांच्या वर हवे. सात दिवसांपेक्षा कमी वय असलेल्या बाळांना घेऊन तुम्ही विमान प्रवास करु शकत नाही.
नवजात बालकांसोबत विमान प्रवास करताना कोणती कागदपत्रे बाळगावी?
नवजात बालकाला घेऊन प्रवास करत असताना काही कागदपत्रे सादर करावी लागतात. तर ही कागदपत्रे दाखवली नाहीतर तर बाळाच्या तिकिटांचे पूर्ण पैसे भरावे लागतात. त्यामुळं तिकिट बुक करताना व प्रवास करताना ही कागदपत्रे जवळ बाळगायला विसरु नका.
- जन्माचा दाखला
-आईच्या हॉस्पिटलचे डिस्चार्ज पेपर
- लस प्रमाणपत्र
- पासपोर्ट