Ayodhya ram mandir: सोमवारी म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून संपूर्ण देशात या सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. संपूर्ण अयोध्या नगरी या सोहळ्यासाठी सजली आहे. 8 हजारांहून अधिक पाहुण्यांच्या उपस्थितीय रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडणार आहे. अनेक दशकांपासून सुरु असलेल्या वादानंतर अखेर या ठिकाणी उभ्या राहिलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाची ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे ती मूर्ती 51 इंचांचीच आहे. या मूर्ती खाली असलेल्या कमळाच्या फुलासहीत उंची ग्राह्य धरल्यास ती 8 फुटांची आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढ्या भव्य मंदिरात 51 इंचाची मूर्ती

5 वर्षांच्या रामलल्लाची ही मनमोहक मूर्ती कमळाच्या फुलासह विराजमान झालेली आहे. आता हे वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढे कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन साजरा केला जात असलेला भव्यदिव्य सोहळा, आमंत्रणं, कार्यक्रमकांची रेलचेल आणि बऱ्याच गोष्टींनंतर एवढ्या मोठ्या मंदिरात रामलल्लांची फक्त 51 इंचाची मूर्ती का असणार आहे? एवढ्या अवाढव्य आणि भव्य मंदिरात रामलल्लांची एवढ्या छोट्या उंचीची मूर्ती का असणार आहे? तर या मागे एक खास कारण आहे. हेच कारण आपण जाणून घेणार आहोत.

5 वर्षांतील बाल्यावस्थेतील मूर्तीची स्थापना का केली जाणार?

चाणक्यनीतीमध्ये आणि अनेक विद्वांनांनी केलेल्या दाव्यानुसार मानुष्यप्राण्यामध्ये वयाच्या 5 वर्षापर्यंत लहान मुलांचं मन अबोध असतं. त्यामुळेच अशा अल्पवयीन बालकांच्या चुका माफ केल्या जाऊ शकतात. अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामचंद्रांची बाल्यावस्थेतील मूर्ती स्थापन होणार आहे. हिंदू धर्मात बालपण हे साधारणपणे 5 वर्षे वयापर्यंत मानलं जातं. यानंतर बालक सज्ञान होण्याकडे वाटचाल सुरु करतो. त्याला या वयापासून आजूबाजूच्या गोष्टी, व्यक्तींची अधिक चांगल्याप्रकारे ओळख होऊ लागते. त्यामुळे आयुष्यातील पहिली 5 वर्ष ही फार महत्त्वाची मानली जातात. अयोध्या हे प्रभू रामचंद्राचं जन्मस्थान मानलं जातं. त्यामुळे त्यांचं संपूर्ण बालपण याच ठिकाणी गेलं असं रामभक्त मानतात.

मूर्ती 51 इंचाचीच का?

22 जानेवारीला अयोध्येत स्थापन होणारी श्रीरामांची मूर्ती 51 इंचांची आहे. साधारपणे 5 वर्षांच्या आतील मुलांची उंची ही 43 ते 45 इंचांपर्यंत असते. श्रीरामांच्या काळात म्हणजेच द्वापार युगात 5 वर्षांपर्यंतच्या लहान मुलांची सरासरी उंची 51 इंचांपर्यंत असायची असं मानलं जातं. म्हणून रामलल्लाची मुर्ती ही 51 इंचांची आहे.

शालिग्राममध्ये साकारली मूर्ती

अयोध्यात स्थापन होणारी रामलल्लाची मूर्ती ही कोणत्याही मौल्यावान धातूची नसून ती शालिग्राम पासून साकारण्यात आली आहे. शालिग्राम हा एक प्रकारचा जीवाश्म स्वरुपाचा दगड असून तो नदीच्या किनाऱ्यावर सापडतो. शालिग्रामला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्तव आहे. शिवभक्त शंकाराची पिंड साकारतानाही शालिग्रामलाच प्राधान्य देतात. हिंदू धर्मामध्ये देवदेवतांची मूर्ती शालिग्राम दगडात कोरली जाते. तसेच प्रभू श्रीराम हा विष्णूचाच अवतार मानला जातो. त्यामुळेही जाणीवपूर्वकपणे अयोध्येतील रामलल्लाची मूर्ती शालिग्राममध्ये साकारण्यात आली आहे.