उदयपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू असले तरी त्यांना हिंदुत्वाबद्दल काहीच माहीत नाही, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते शनिवारी उदयपूरमध्ये बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी म्हटले की, 'हिंदुत्वाचे सार काय आहे? गीता काय सांगते? ज्ञान सर्वांकडे आहे. ज्ञान आपल्या चहूबाजूला आहे, परंतु पंतप्रधान म्हणतात ते हिंदू आहेत. पण हिंदुत्वाचा मूळ पायाच त्यांना माहीत नाही. ते कुठल्या प्रकारचे हिंदू आहेत?, असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला. 


यावेळी राहुल यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावरूनही पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही तीन वेळा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक झाला होता. हे तुम्हाला माहिती आहे? पाकिस्तानच्या सततच्या कुरापतींमुळे त्यांना उत्तर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यावेळी लष्कराने मनमोहन सिंग यांनी सांगितले होते. मनमोहन सिंग यांनी ही गोष्ट देशाच्या उद्देशांसाठी गुप्त ठेवली होती. मात्र, मोदींनी सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशमध्ये मोदींना पराभव दिसत होता. त्यामुळे मोदींनी सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण केले. परंतु, सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय लष्कराचा असल्याचे यावेळी राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.