आजवर आपल्या शत्रूंना जमलं नाही ते आता मोदी करतील- राहुल गांधी
हा भारतमातेचा आवाज आहे आणि तुम्ही त्याच्याविरोधात उभे ठाकले आहात.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही देशात रोजगार निर्माण करू शकला नाहीत. देशाची अर्थव्यवस्थाही तुम्हाला चालवता आली नाही. आता तुम्ही लपण्यासाठी द्वेषाचा आडोसा घेत आहात. यामुळे देशाचा विकास ठप्प झाला आहे. आजवर शत्रूंनी आपली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, आपल्या शत्रूंना जे साध्य झाले नाही, ते आता नरेंद्र मोदी करतायत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. ते सोमवारी दिल्लीच्या राजघाटावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
झारखंडच्या निकालानंतर अमित शाह म्हणाले...
राहुल गांधी यांनी म्हटले की, देशभरात सुरू असलेली आंदोलने हा काँग्रेसचा आवाज नाही. हा भारतमातेचा आवाज आहे आणि तुम्ही त्याच्याविरोधात उभे ठाकले आहात. जेव्हा विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडल्या जातात, लाठीमार केला जातो किंवा पत्रकारांना धमक्या दिल्या जातात, तेव्हा तुम्ही हा आवाज दाबू पाहता. मात्र, देशातील जनता तुम्हाला संविधानाचा आणि भारतमातेचा आवाज दडपू देणार नाही, असे राहुल यांनी म्हटले.
आंदोलकांच्या कपड्यांवरून हिंसाचार करणारे कोण आहेत, हे लक्षात येत असल्याची भाषा तुम्ही करता. या कपड्यांसाठीच तुम्हाला सारा देश ओळखतो. दोन कोटीचा सूट परिधान करणारे तुम्हीच होता, देशातील जनता नव्हे, असा टोला राहुल यांनी मोदींना लगावला.