फाटलेल्या नोटांचं काय करायचं? जाणून घ्या आरबीआयचा नियम काय सांगतो
तुम्ही तुमच्याकडे असलेल्या फाटलेल्या नोटा बदलू शकता. आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
RBI Rule On Torn Note: आपल्याकडे कळत-नकळत फाटलेल्या नोटा येतात. कधी कधी काही जण जाणीवपूर्वक गर्दीचा फायदा घेऊन फाटलेल्या नोटा हातात टेकवतात. त्यामुळे फाटलेल्या नोटांचं करायचं काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही तुमच्याकडे असलेल्या फाटलेल्या नोटा बदलू शकता. आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आरबीआयनुसार कोणतीही फाटलेली नोट पुन्हा वापरात आणली जाऊ शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियम, 2009 नुसार, नोटा स्वीकारल्या पाहिजेत आणि बदलल्या पाहिजेत. या कायद्यानुसार या नोटांच्या स्थितीवर रिफंड व्हॅल्यू उपलब्ध असेल. नोटा कोणत्याही सरकारी बँकेच्या शाखेत, कोणत्याही खाजगी क्षेत्रातील बँकेच्या करन्सी शाखेत किंवा आरबीआयच्या कोणत्याही इश्यू ऑफिसला भेट देऊन बदलून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही. RBI चे काय नियम आहेत, जाणून घेऊयात.
नोटा एक भाग गहाळ असेल किंवा दोनपेक्षा जास्त तुकडे झाले असतील तर नोट बदलली जाऊ शकते. पण नोटेवरील गॅरेंटी आणि प्रॉमिस क्लॉज, अधिकार्याचे नाव, सिग्नेचर, अशोक स्तंभ, महात्मा गांधींचा फोटो, वॉटर मार्क यासारख्या बाबी गहाळ असतील तर तुमची नोट बदलली जाणार नाही. दुसरीकडे नोटा अधिक काळ चलनात राहिल्याने खराब होतात, अशा नोटा बदलता येतात.
जळलेल्या किंवा चिकटलेल्या नोटा देखील बदलल्या जाऊ शकतात. परंतु यासाठी बँकेत नाही तर, RBI च्या इश्यू ऑफिसमध्ये जावं लागेल. येथे तुमच्या नोटचे नुकसान कसं झालंय याची तपासणी केली जाईल, त्यानंतर त्याचं मूल्य निश्चित केलं जाईल.
अशा परिस्थितीत बँकांना तुम्हाला मदत करावी लागेल
बँकांना तुम्हाला नवीन आणि चांगल्या दर्जाच्या नोटा आणि नाणी द्यावी लागतील.
खराब झालेल्या, घाण झालेल्या आणि फाटलेल्या नोटा बदलल्या जाऊ शकतात.
सर्व प्रकारच्या नोटा आणि नाणी बदलून किंवा व्यवहारात वापरता येतात.
कोणत्याही बँकेच्या शाखा कोणत्याही लहान मूल्याच्या नोटा किंवा नाणी बदलण्यास नकार देऊ शकत नाहीत.