नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये वाढता हिंसाचार रोखण्यासाठी पीडीपी आणि भाजपचे सरकार अपयशी ठरले. सरकार स्थापन झाल्यापासून  दहशतवाद बळावला. केंद्र सरकारला हा दशवाद रोखण्यात अपयश आले. तीन वर्षांनी भाजपने आपली चूक मान्य करत सत्तेतून काढता पाय घेतला आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. दरम्यान, पत्रकार मारले गेले, सामान्य माणसे मारली गेली, सैनिक मारले गेले या सगळ्याची जबाबदारी याच दोन्ही पक्षांची आहे. या दोन्ही पक्षांचे सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही हे वाटतच होते. तेच आता घडले आहे, असे काँग्रेसने म्हटलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू काश्मीरमध्ये मागील तीन वर्षांत दहशतावादी हल्ले वाढल्याने सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे. भाजपने जम्मू काश्मीरला बरबाद करण्याचे काम केले. पैसे खाल्ले, भ्रष्टाचार केला आणि आता सत्तेतून बाहेर पडले आहे. रमजानच्या महिन्यात ४१ हत्या झाल्या आणि २० बॉम्ब हल्ले झाले या सगळ्या घटनांच्या जबाबदारीपासून भाजप पळ काढू शकत नाही. पीडीपी आणि भाजप हे दोन्ही पक्ष जम्मू काश्मीरच्या अशांततेसाठी जबाबदार आहेत, असाही आरोप गुलाम नबी आझाद यांनी केला. 



जम्मू काश्मीरला विकासाचे स्वप्न दाखवून भाजपने आणि पीडीपीने तिथल्या नागरिकांची फसवणूक केली. काँग्रेस किंवा नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये होते तेव्हा विकास होत होता, अनेक कामेही सुरु झाली होती. हे सरकार आता गेले त्यामुळे जम्मू काश्मीरच्या लोकांनी थोडासा का होईना सुटकेचा निश्वास सोडला असेल असाही टोला आझाद यांनी लगावला.