COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरत चालली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसरी लाट लहान मुलांसाठी  अधिक धोकादायक असेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. मात्र लहान मुलांसाठी अद्याप तरी कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे पालकांची  धाकधूक वाढली आहे. मात्र पालकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 


लहान मुलांसाठीची कोरोना प्रतिबंधात्मक लस पुढील 2 आठवड्यांत उपलब्ध होईल. नीती आयोगानं याबद्दलची माहिती दिली आहे. झायडस कॅडिला कंपनीच्या  लसीला पुढील 2 आठवड्यांत आपत्कालीन वापराची परवानगी मिळू शकते, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे. झायडस  कॅडिलाची लस 67 टक्के प्रभावी असून ती 12 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी आहे.


झायडस कॅडिलानं आपत्कालीन वापराच्या परवानगीसाठी आवश्यक असलेल्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. अहमदाबादस्थित औषध कंपनीनं चाचण्यांच्या २ टप्प्यांचे  निष्कर्ष भारतीय औषध महानियंत्रकांकडे (डीसीजीआय) सुपूर्द केले आहेत. 


डीसीजीआयनं परवानगी दिल्यास झायडस कॅडिलाकडून पुढील २ आठवड्यांत लसींच्या वितरणास सुरुवात केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. झायडस कॅडिलानं तिसऱ्या टप्प्यातील चाचणीदेखील पूर्ण केली आहे. यामध्ये 28 हजार स्वयंसेवकांचा सहभाग होता.