`...तेव्हा अर्थिक ज्ञान कमी होतं, मागून वार न करता थेट राजकारणात उतरा अन्...`; रघुराम राजन यांना मंत्र्यांचं चॅलेंज
Union Minister Slams Ex RBI Chief Raghuram Rajan: जेव्हा अर्थतज्ज्ञ राजकीय तज्ज्ञ होतात तेव्हा त्यांचं अर्थविषय ज्ञान कमी होतं अशा अर्थाचा टोलाही या केंद्रीय मंत्र्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माजी गव्हर्नरबद्दल बोलताना लगावला आहे. नेमकं ते असं का म्हणालेत जाणून घेऊयात...
Union Minister Slams Ex RBI Chief Raghuram Rajan: केंद्रीय रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिक मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर निशाणा साधला आहे. 'रघुराम राजन हे असे राजकीय तज्ञ आहेत जे कोणाकडूनही पाठीवर वार करु शकतात', असं विधान वैष्णव यांनी केलं आहे. वैष्णव यांनी हे विधान रघुराम राजन यांच्या कथित विधावार आलं आहे ज्यामध्ये त्यांनी एका प्रस्नाला उत्तर देताना भारत प्रोडक्शन लिंक्ड इंसेन्टीव्ह योजनेअंतर्गत मोबाईल फोनची निर्मिती करत नसून केवळ त्यांची बांधणी करत असल्याचं म्हटलं होतं. वैष्णव यांनी 'जेव्हा चांगले अर्थतज्ज्ञ राजकीय तज्ज्ञ होतात तेव्हा त्यांचं आर्थिक ज्ञान कमी होतं,' असा टोला रघुराम राजन यांना लगावला आहे.
पाठीमागून हल्ला करु नका
अश्विनी वैष्णव यांनी रघुराम राजन आता नेते झाले आहेत, अशी खोचक प्रतिक्रियाही नोंदवली. त्यांनी उघडपणे समोर आलं पाहिजे, निवडणूक लढली पाहिजे आणि राजकीय घडामोडींमध्ये भाग घेतला पाहिजे, असा सल्लाही अश्विवी वैष्णव यांनी दिला. "पाठीमागून हल्ला करणं चांगली गोष्ट नाही. ते इतर कोणाच्या तरी बाजू घेत अशी विधान करत आहेत," असंही अश्वीनी वैष्णव यांनी म्हटलं.
सर्वच देशांनी अशीच वाटचाल केली
पुढील 2 वर्षांमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीमध्ये 30 टक्के अधिक वाढ करेल. जगभरामध्ये मोबाईल फोनसाठी आवश्यक असलेल्या सुट्या भागांची भारतातील 3 कंपन्या लवकरच निर्मिती करणार आहेत, असंही वैष्णव यांनी सांगितलं. ज्या ज्या देशांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्मिती सुरु केली आहे त्यांनी आधी पूर्णपणे नॉक्ड-डाऊन (सीकेडी) घटक, सेमी नॉक्ड-डाऊन (एसकेडी) उद्योगांना आर्षित करण्याबरोबरच उत्पादनांची बांधणी करण्याचा मार्गच निवडला, असं सांगत वैष्णव यांनी भारताची वाटचालही अशीच सुरु असल्याचं म्हटलं.
भारत 2 वर्षात कुठे असेल?
आज जागतिक स्तरावर पुरवठा साखळी एवढी गुंतागुंतीची आहे की कोणात्याही देशाला 40 टक्क्यांहून अधिक मूल्यवर्धित बाजारपेठेचा दावा करता येणार नाही. भारत येणाऱ्या 2 वर्षांमध्ये अधिक मूल्यवर्धनासंदर्भात 30 टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला.
राजन यांची टीका योग्य नाही
"ज्यापद्धतीने रघुराम राजन टीका करत आहेत ती योग्य नाही. ते फारच उत्तम अर्थतज्ज्ञ आहेत. मी त्यांना अर्थतज्ज्ञ रहावं किंवा राजकीय तज्ज्ञ व्हावं असं सांगू इच्छितो," असा टोला अश्विनी वैष्णव यांनी लगावला. काही महिन्यांपूर्वी राहुल गांधींनी काढलेल्या कन्याकुमारी ते काश्मीरदरम्यानच्या 'भारत जोडो यात्रे'दरम्यान रघुराम राजनही सहभागी झाले होते. ही यात्रा राजस्थानमध्ये पोहोचली तेव्हा ते राहुल गांधींसोबत काही एका टप्प्यात एकत्र चालले होते.