मोदींनी सांगितलं, गांधीजी लहानपणी घाबरल्यावर कोणाचं नाव घ्यायचे?
भीती नावाची गोष्टच अस्तित्वात नाही, हे तुम्ही मनाशी पक्के केले पाहिजे.
वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वाराणसीच्या नरूर येथील शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांना जीवनात कधीही घाबरू नका, असा उपदेश केला. त्यासाठी भीती नावाची गोष्टच अस्तित्वात नाही, हे तुम्ही मनाशी पक्के केले पाहिजे, असेही मोदींनी सांगितले.
यासाठी मोदींनी विद्यार्थ्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे उदाहरण दिले. लहानपणी गांधीजींना अंधाराची भीती वाटायची. तेव्हा गांधीजींच्या आईने त्यांना रामनामाचा जप करायला सांगितले. त्यानंतर अंधारातून चालताना गांधीजी नेहमी रामाचे नामस्मरण करायचे, असे मोदींनी सांगितले.
तसेच मोदींनी विद्यार्थ्यांना आवर्जून खेळण्यासही सांगितले. विद्यार्थ्यांनी घराबाहेर पडून खेळले पाहिजे, ते खूप महत्वाचे आहे, असे मोदींनी सांगितले.