...जेव्हा छापण्यात आल्या 0 रुपयाच्या नोटा, एक गरज ठरली कारणीभूत; जाणून घ्या रंजक किस्सा
तुम्ही 1 रुपयापासून ते 2000 रुपयांपर्यंतच्या नोटा पाहिल्या असतील. पण तुम्ही कधी 0 रुपयाची नोट पाहिली आहे का? एकदा देशात या नोटा छापण्यात आल्या होत्या. पण त्याची गरज का भासली हे जाणून घ्या.
तुम्ही 1 रुपयापासून ते 2000 रुपयांपर्यंतच्या नोटा पाहिल्या आणि वापरल्या असतील. पण तुम्हाला माहिती आहे का, एकदा देशात चक्क शून्य रुपयाच्या नोटा छापण्यात आल्या होता. हो, तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे, शून्य रुपयाची नोट जिचं काहीच मूल्य नव्हतं. या नोटा फक्त छापण्यात आल्या नाहीत तर लोकांमध्ये वाटण्यातही आल्या होत्या. पण शून्य रुपयाची नोट छापण्याची गरज नेमकी का निर्माण झाली? ही नोट कोणी छापली होती? याबद्दल जाणून घ्या.
झालं असं होतं की, 2007 मध्ये चेन्नईतील एक स्वयंसेवी संस्था 5 पिलरने (5th Pillar) या शून्य रुपयाच्या नोटा छापल्या होत्या. या नोटेला सरकार किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणतीही मान्यता दिली नव्हती. पण यानंतरही या नोटेला हजारो लोकांपर्यंत पोहोचवत एनजीओने जनतेला एक खास संदेश दिला होता. ही नोट हिंदू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलुगू भाषेत छापण्यात आली होती.
पण या नोटा छापण्याची गरज का भासली?
देशातील सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार इतका वाढला होता की, लोक कंटाळले होते. प्रत्येक कामासाठी लाच देण्याची जणू प्रथाच सुरु झाली होती. याविरोधात 5 पिलर एनजीओने मोहीम उघडली होती. या मोहिमेअंतर्गत शून्य रुपयाच्या नोटा छापून रेल्वे स्थानकं, बस स्थानकं आणि बाजारांमध्ये वाटण्यात आल्या. एनजीओने लोकांना लाचखोरी आणि भ्रष्टाचाविरोधात जागरुक होण्याचं आवाहन करत त्यांच्या अधिकारांची माहिती दिली.
एनजीओने लग्नांमध्ये जाऊन लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणारे बुकलेट आणि शून्य रुपयाच्या नोटा वाटल्या. इतकंच नाही तर विद्यार्थी आणि लोकांनी शून्य रुपयाचं 30 फूट लांब आणि 15 फूट रुंद बॅनरही झळकावलं. या बॅनरच्या आधारे 1200 शाळा, कॉलेज आणि सभांमध्ये जाऊन भ्रष्टाचाराविरोधात लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात आली. ही मोहीम तब्बल 5 वर्षं सुरु होती. यादरम्यान एकूण 5 लाख लोकांनी झिरो करप्शनविरोधात उभं राहणाऱ्यासाठी स्वाक्षरी केली.
कशी होती ही नोट
शून्य रुपयाची ही नोट दिसताना तंतोतंत 50 रुपयाच्या नोटेसारखी होती. या नोटेच्या समोर आणि खालील बाजूला 'मी कधी लाच घेणार नाही, देणारही नाही' अशी शपथ लिहिली होती. एनजीओने सर्वात आधी 25 हजार नोटा छापून चेन्नईत वाटप केलं. यानंतर ही मोहीम 2014 पर्यंत चालवण्यात आली. यावेळी देशभरात 25 लाख नोटा वाटण्यात आल्या. एखाद्याने लाच मागितली तर याच नोटा त्यांना द्या असा त्यामागचा हेतू होता.