आरोग्याची काळजी घ्या म्हणताच स्टेजवर कोसळले प्रा. समीर खांडेकर; Heart Attack ने निधन
IIT Kanpur Pvt Sameer Khandekar : आयआयटी कानपूरचे प्राध्यापक समीर खांडेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. एका कार्यक्रमात बोलत असतानाच खांडेकर खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
IIT Kanpur : आयआयटी कानपूरच्या एका वरिष्ठ प्राध्यापकाचा व्याख्यान देताना मृत्यू झाला आहे. 22 डिसेंबर रोजी आयआयटी कानपूरचे प्राध्यापक समीर खांडेकर (Pvt Sameer Khandekar) हे विद्यार्थी कल्याण कार्यक्रमात व्याख्यान देत होते. लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे समीर खांडेकर सांगत होते. त्याचवेळी खांडेकर हे स्टेजवरच खाली कोसळले. त्यानंतर खांडेकर यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नसला तरी हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचा संशय डॉक्टरांना आहे.
प्राध्यापक समीर खांडेकर हे 22 डिसेंबर रोजी आयआयटीच्या सभागृहात माजी विद्यार्थी मेळाव्याला संबोधित करत होते. त्यावेळी ते उत्तम आरोग्याबद्दल बोलत होते. त्याच क्षणी त्यांना अचानक छातीत दुखू लागलं आणि ते काही वेळ खाली बसले. ते भावनिक होऊन बसला आहे असे लोकांना वाटत होतं. खांडेकर यांनाही काहीच समजले नाही. मात्र काही वेळाने प्राध्यापक खांडेकर हे तेथेच बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना हृदयरोग रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
आयआयटी कानपूरच्या मॅकेनिकल इंजिनीयरिंग विभागाचे प्रमुख या पदांवर प्राध्यापक खांडेकर कार्यरत होते. सभागृहात व्याख्यानासाठी माजी विद्यार्थी जमले होते. खाली कोसळण्याआधी प्रा. खांडेकर यांनी “तुम्ही सर्वांनी आरोग्याची काळजी घ्या”, असे म्हटलं होतं. त्यांचा आवाज देखील अडखळत होता. खाली कोसळण्यापूर्वी ते खूप घामाघूम झाले होते. बोलता बोलता भावनेच्या भरात ते खाली बसले आहेत असे अनेकांना वाटलं. मात्र त्यांची कोणतीच हालचाल होत नसल्याने सर्वानी स्टेजकडे धाव घेतली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अहवालानुसार, प्राध्यापक खांडेकर यांचा मृतदेह आयआयटीच्या आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला आहे. त्यांची मुले केंब्रिज विद्यापीठात शिकतात. त्यामुळे त्यांचा मुलगा आल्यानंतरच अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती समोर आली आहे. भारतात खांडेकर यांच्या कुटुंबातील त्याचे आई-वडील आणि त्यांची पत्नी आहे. दरम्यान, खांडेकर यांना 2019 पासून कोलेस्ट्रॉलशी संबंधित आरोग्याचा त्रास सुरू होता. तेव्हापासून त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, प्राध्यापक खांडेकर यांचा जन्म जबलपूर येथे झाला होता. आयआयटी कानपूरमधूनच त्यांनी बीटेक केले. पुढे जर्मनीतून त्यांनी पीएचडी घेतली. तेथून आल्यानंतर 2004 मध्ये ते आयआयटी कानपूरमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू झाले. पदोन्नतीनंतर ते असोसिएट प्रोफेसर, तत्कालीन मेकॅनिकल विभागाचे प्रमुख झाले.