नेहरुंनंतर कोण विचारणाऱ्यांना जनतेने तेव्हा चपराक लगावली; आताही लगावेल- मायावती
यापूर्वीही जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार? असा प्रश्न विचारला जायचा.
लखनऊ: विरोधकांकडे पंतप्रधानपदासाठी सक्षम नेता नाही, या भाजपच्या आक्षेपाला गुरुवारी बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सर्वेसर्वा मायावती यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपचा हा दावा म्हणजे एकप्रकारे जनतेचा अपमान आहे. विरोधकांकडे पंतप्रधानपदासाठी सक्षम उमेदवार नाही, असे भाजपकडून वारंवार सांगितले जाते. मात्र, यापूर्वीही जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार? असा प्रश्न विचारला जायचा. परंतु जनतेने त्यावेळी या वायफळ चर्चेला सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. आतादेखील त्याचीच पुनरावृत्ती होईल, असा विश्वास मायावती यांनी व्यक्त केला.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाला विरोध असणारे राजकीय पक्ष एकटवले आहेत. मात्र, विरोधकांच्या महाआघाडीकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखा सक्षम नेता नसल्याचा दावा भाजपकडून वारंवार केला जातो. मात्र, विरोधकांनी महाआघाडीचा पंतप्रधान कोण हा निर्णय निवडणुकीनंतर घेऊ, अशी भूमिका घेतलेली आहे.
दरम्यान, मायावती यांनी निवडणूक आयोग नरेंद्र मोदी यांना झुकते माप देत असल्याचा आरोपही केला. मोदी निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत. त्यांनी अनेकदा पातळी सोडून महिलांचा अपमानही केला आहे. मात्र, निवडणूक आयोगाकडून याकडे कानाडोळा केला जात असल्याचेही मायावती यांनी सांगितले.