Odhisha Train Accident : कुणाचं जवळचं माणूस कायमचं दुरावलं. कुणाचे प्रियजन त्यांना सोडून कायमचे निघून गेले. जे कुणी उरलेत, त्यांचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे.  ही कहाणी आहे ओडिशातल्या बालासोरमधल्या भीषण रेल्वे अपघाताची (Balasore Railway Accident). रेल्वे रुळावर तीन गाड्यांचे उलटलेले डबे, मोडलेले इलेक्ट्रिक खांब, वाकलेले रूळ अशी ही भयानक दृश्य. इथं मृत्यूनं अक्षरशः तांडव केलं. या अपघातात तब्बल 288 लोकांना जीव गमवावा लागला. तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉस्पिटल्समध्ये निरपराध प्रवासी जीवन आणि मृत्यूशी संघर्ष करत आहेत. या दुःखद घटनेनंतर संपूर्ण देशभरात प्रार्थना केल्या जातायत. तर दुसरीकडं दुर्घटनेवरून राजकारण सुरू झालंय. काँग्रेससह (Congress) विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दुर्घटनेचं खापर केंद्र सरकारवर फोडलंय. तर माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी (Dinesh Trivedi) यांनी ओडिशामधील रेल्वे दुर्घटना (Odisha Train Tragedy) अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं आहे. या दुर्घटनेची वेळ विचित्र असून, यामागे कट असू शकतो असं ते म्हणाले आहेत. या दुर्घटनेची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.   


दरम्यान, या दुर्घटनेनंतर केंद्र सरकारही अलर्ट मोडवर आलं.. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेऊन मदतकार्याची पाहणी केली. तसंच हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.  ओडिशाच्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल अशी घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. दरम्यान, एवढा मोठा अपघात नेमका घडला तरी कसा, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय... 


रेल्वे दुर्घटनेची INSIDE STORY
कोरोमंडल एक्सप्रेस अप लाईनवरून धावत होती. तर लूपलाईनवर मालगाडी उभी होती. डाऊनलाईनवरून यशवंतपूर एक्सप्रेस निघाली होती. सर्वात आधी कोरोमंडल एक्सप्रेस रूळावरून घसरली. कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे रेल्वेरुळांवर दोन्ही बाजूंना पडले. काही डबे मालगाडीवर पडले, तर काही डाऊन लाईनवर. त्याचवेळी यशवंतपूर एक्सप्रेस डाऊन लाईनवरून चालली होती. यशवंतपूर एक्सप्रेसचे 2 डबे कोरोमंडल एक्सप्रेसला धडकले आणि ही भीषण दुर्घटना घडली


या दुर्घटनेचं नेमकं कारण काय? सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळं दुर्घटना घडली का? या चुकीला नेमकं जबाबदार कोण? या प्रश्नांची उत्तरं चौकशीनंतर समोर येतील.. मात्र अत्याधुनिक सुविधा आणि हायटेक यंत्रणा कार्यरत असतानाही अडीचशेहून अधिक निरपराध लोकांचे बळी अशाप्रकारे जावेत, ही निश्चितच दुर्दैवाची बाब आहे.