जयपूर : राजेश पायलट यांचा मुलगा सचिन पायलट यांना आज राजस्थानचं मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सचिन पायलट यांचा जन्म ७ सप्टेंबर १९७७ रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये झाला. सचिन पायलट हे काँग्रेसचे लोकप्रिय नेते राजेश पायलट यांचे चिरंजीव आहेत. राजेश पायलट हे काँग्रेसचे केंद्रीय मंत्री होते. राजेश पायलट यांचा वयाच्या ५५ व्या वर्षी रस्ते अपघातात मृत्यू झाला, ते स्वत: गाडी चालवत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील नोयडातीमधील वेदपुरा हे त्यांचं मूळ गाव आहे. सचिन पायलट यांचं शिक्षण नवी दिल्लीतील एअरफोर्स बाल भारती विद्यालयात झालं, पुढील शिक्षण सेंट स्टिफेंस कॉलेजमध्ये केलं, यानंतर त्यांनी अमेरिकेतील पेंसिलवेनिया विद्यापीठातही शिक्षण घेतलं.


सचिन पायलट यांनी २००४ मध्ये सारा अब्दुल्लाह यांच्याशी विवाह केला, काश्मीरचे दिग्गज नेते फारूक अब्दुल्ला यांची सारा मुलगी आहे. सचिन पायलट यांची दोन मुलं आहेत. आरान आणि वेहान पायलट.


चौदाव्या लोकसभेसाठी काँग्रेसकडून त्यांनी दौसामधून निवडणूक लढवली आणि जिकले, त्यावेळी त्यांचं वय २६ वर्ष होतं. त्यावेळी भारतात सर्वात कमी वयाचा खासदार होण्याचा तो विक्रम होता. यानंतर पंधराव्या लोकसभा निवडणुकीसाठी २००९ मध्ये त्यांनी अजमेरहून निवडणूक लढवली, आणि ते अजमेरचे खासदार झाले.


सचिन पायलट केंद्रीय मंत्री देखील होते, ते २०१४ मध्ये राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सचिन पायलट यांची भूमिका महत्वाची मानली गेली.