रामराजे शिंदे, नवी दिल्ली : जयपूरवरून झालावाड-झालरापाटनमध्ये गेल्यावर सर्वात अगोदर राहुल गांधी यांची सभा पाहिली. मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघातून राहुल गांधी यांनी प्रचार सभा सुरू केली. राहुल यांच्या सभेला प्रतिसाद चांगला होता. राहुल गांधी यांच्या सभेला मध्य प्रदेशातील लोक मोठ्या प्रमाणावर आली होती. राजस्थान आणि मध्य प्रदेश सीमेजवळील भाग असल्यामुळे असल्यामुळे भाजप आणि काँग्रेस दोघांच्याही प्रचारासाठी मध्य प्रदेशातून लोक आयात केले जातात. झालावाडची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी ग्रामीण भागात जायचं ठरवलं. 


राजेंच्या मतदारसंघात प्रजेचे हाल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालावाडमध्ये फिरत असताना स्वरूप सिंग नावाचा शेतकरी भेटला. त्याच्याशी गप्पा मारल्या. मी म्हणालो, महाराणी फिरसे मुखमंत्री बनेगी? तो भडकला. म्हणाला, 'महाराणीने हमारा गला काट दिया है! बच्चों को कैसे पढाऐंगे. आत्मा जल रही है. महाराणी साब सिर्फ देख रही है. उसे चुनके देना हमारी गलती थी.' मी म्हणालो, महाराणीने रास्ता बनाया है ना? तो म्हणाला, रस्ता बनाया लेकीन किसानों के लिए क्या क्या ? किसानों के जुते देखो और ६०-७० हजार कमानेवाले के पैर में २ हजार रूपये की चप्पल देखो!’


तो तावातानं सांगत होता. 'महाराणी यांनी काय मोठं काम केलं नाही. अजून तर शेतक-यांचं व्याज चुकवलं नाही. १ लाख रूपयावर २५ हजार माफ केले.  पण त्यासाठी अट घातली की अगोदर १ लाख भरा मगच त्यावर २५ हजारची सूट मिळेल. आता १ लाख रूपये कुठून आणणार? '


त्याच्या म्हणण्यात किती तथ्यता आहे हे जाणून घेण्यासाठी खेडेगावात जायचं ठरवलं. झालावाड पासून २५ मिनिटाच्या अंतरावर टोण्डा नावाचं गाव आहे. तिथे गावात गेल्यावर काही गावकरी गप्पा मारत बसली होती. त्यांना विचारलं, यावेळेस शेतात काय पिकवलं. त्यावर एक शेतकरी म्हणाला, जे पिकवलं ते विकलं गेलं नाही. तसंच पडून आहे. चला तुम्हाला दाखवतो. शेतात गेलो तर लसणाच्या पोती पडून होत्या. शेतात जाऊन शेतक-यांशी गप्पा मारल्या. लसूणसाठी ३२ रूपये खर्च आला पण दोन रूपयांनी विकला गेला. खर्च सुद्धा निघाला नाही. मजदूरांना रोख पैसे द्यावे लागत असल्यामुळे शेतक-यांना व्याजानं पैसे घेतले होते. आता ते कर्ज कसं फेडायचं ही चिंता. 



सत्ताधा-यांची दलाली


एकजण म्हणाला, वसुंधरा तर कधी फिरकल्या नाहीत. मत मागायला येतात पण ५ वर्षात तोंड दाखवत नाहीत. झालावाड भागात ८० टक्के शेतकरी आहेत. इथे दलाल-ठेकेदाराची मिलीभगत आहे. लसूण विकत घेण्याचं काम सुरू करण्यात आलं तेंव्हा शेतक-यांना टोकण देण्यात आले. परंतू दलालानं परस्पर त्या टोकन क्रमांकावर दुस-या शेतक-याकडून लसूण खरेदी केला. त्यात दलालाला कमिशन मिळतं. एक एक दलाल १०० शेतक-यांचे टोकण घेतो. शेतक-यांना सांगतात पुन्हा या. सरकारने दिलेले टार्गेट पूर्ण केले जातं. पण शेतक-यांना सवलत मिळत नाही. १ हजार पेक्षा जास्त टोकण जनरेट झाले तरी काही टोकण जुन्या क्रमांकाने जनरेट होतात. म्हणजेच मागील टोकण क्रमांकावर लसूण खरेदी केली जाते.


एका शेतक-याला ३ लाख रूपये खर्च आला पण २५ हजार मिळाले. मजदूराचे पण पैसे मिळाले नाहीत. गाडीचा किराया देता येत नाही. मुलांना सांगावे लागते पैसे नाही मिळाले. आई वडील अपंग आहेत. तो म्हणाला, लसूण करून चूक केली. काही पोती फेकून दिल्या.


हजारो लोक आहेत त्यांच्याकडे टोकन आहेत. पण लसूण घेतले नाही. त्यामुळे लसून कच-यात टाकावा लागला. ५-१० हजार रूपये घेऊन दुस-या शेतक-याचे टोकन घेतले जाते. भाजपचे कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून दलाली होत असल्याचा आरोप शेतक-यांनी केला. उडीद मध्ये मोठा घोळ झाला. ई मित्रवाल्याकडे टोकण रजिस्टर करण्यासाठी केवळ चार तास दिले. त्याच वेळेत लाईट नाही आणि ई मित्र वाल्याचे कधी नेट बंद. मग ख-या शेतक-यांना टोकण मिळालेच नाही. उलट बोगस शेतकरी तयार करून धनाड्यानी उडीद खपवला.


बरं टोकण रजिस्टर करायचं तर उतारा काढावा लागतो. उतारा काढण्यासाठीच ३ दिवस लागतात. कसं टोकण काढणार?. दुस-या शेतक-यानं आपलं दुखणं सांगितलं. मला गहलोत सरकारनं पेन्शन दिली. वसुंधरा ने नवीन नियम आणला. ज्यांना जमीन आहे त्यांची पेन्शन रद्द केली. विधवांची पेन्शन रद्द केली. माझ्या आई- वडीलांची पेन्शन रद्द केली. मुख्यमंत्री कार्यालयाला जाब विचारायला गेलो पण भेटू दिलं नाही. तिथे गेल्यावर सरकारी लोक काठी घेऊन आमच्या मागे लागतात.


७ एकर वाल्यांचे सरकारी बॅंकेतील ५० हजार कर्ज माफ करण्याची घोषणा केली. ज्यांची जमीन जास्त आहे त्यांना पैसे कमी दिले. पण जमीन जास्त म्हणजे खर्च जास्त येतो, हे सरकारनं लक्षात घेतलं नाही. शेतीच्या भरवशावर आता मुलांचं शिक्षण करता येत नाही. कर्ज काढून शिक्षण द्यावं म्हटलं तर बँक कर्ज पण देत नाही. तारण काय आहे हे दाखवा असं बँक म्हणते.


चौडी सरकार


झालावाडमधून थेट अजमेरकडे निघालो. रस्त्यात येणारा ढाबा, चौक, चहाटपरी सगळ्यांशी गप्पा मारत निघालो. अजमेरजवळच केंकडी मतदारसंघात अजगरी नावाचं गाव रस्त्यातच आहे. तिथे सात-आठ गावकरी चहाच्या टपरीवर गप्पा मारत बसली होती. त्यातील केसालाल धाकड यांना विचारलं, यहां वसुंधराने कोई अच्छा काम किया है क्या.. त्यावर केसालाल म्हणाले, ''१ एकड में २५ लिटर डिजल लगता है. बीज, मजदूरों का खर्चा भी आता है. अब डिजल का दाम तो आपको पता है. वसुंधराने बहुत एकही अच्छा काम किया है, इमानदार लोगों को खत्म किया है. किसानों को खत्म किया.''


बागचंद गुर्जर यांना विचारलं की शेतक-यांचे कर्ज वसुंधरा यांनी माफ केलं. मग अजून राग का आहे. त्यावर बागचंद म्हणाले, ''वसुंधरा यांनी ५० हजार रूपये माफ केले परंतू त्याऐवजी शेतमालाला भाव द्यायला पाहीजे होता. कारण शेतमालाला भाव दिला असता तर शेतक-यांची कायमची अडचण सुटली असती. हे सरकार बोगस आहे. शंभर पैकी ९० टक्के लोक नाराज आहेत. भाजपनं या निवडणुकीत नवीन चेहरे देऊन काय उपयोग, कारण जुन्यांनी काहीच केलं नाही. तो वैतागुन म्हणाला, कुछ नही साब, ये चौडी सरकार है.'' सरकारच्या मंत्र्यांमध्ये आलेले अहंकार सामान्य नागरिकांना लगेच कळतो. त्याचं हे उत्तर उदाहरण आहे.



रस्ता गायब होतो तेंव्हा..


बागचंद गुर्जर यांचा संताप व्यक्त झाला त्यासाठी आणखी कारणं आहेत. त्यांनी सांगितलं की, ''आम्हाला महिन्याला २ हजार रूपये लाईट बील येतं. एवढं बिल कसं येतं, याची तक्रार केली पण ऐकत नाहीत. बिल भरावं लागेल असा दम दिला. ऐवढंच नाही बागचंद रोज ये जा करतो तो चांडोली येथील रस्ता बंद करण्यात आला. त्या रस्त्याच्या मधोमध भाजपच्या कार्यकर्त्यानं बंगला बांधला. त्यामुळे बंगल्याच्या दोन्ही बाजूकडील रस्ता बंद झाला. त्याची तलाठी, तहसीलदाराकडे तक्रार केली तर दोघेही म्हणतात तिथे रस्ताच नाही. त्यांनी नकाशातून रस्ताच हडप केला. शौचालयाबद्दलही बागचंद सांगत होता, सरकारनं जाहीरात केली की १२ हजार रूपये शौचालय बांधण्यासाठी दिलं जाईल. लोकांनी स्व खर्चातून शौचालय बांधलं. पण अनेकांचे शौचालयचे पेमेंट दिले नाही. १२ हजार रूपये देतो म्हणून सांगितले पण काहीजणांना १ हजार रूपये दिले.'' आपल्यालेखी गावक-यांच्या आयुष्यात छोट्या छोट्या समस्या असतात. परंतू त्यांच्यासाठी त्या खुप मोठ्या असतात. त्याचाच परिणाम निवडणूकीतून दिसून येतो.


अजमेरचा पराभव पायलटच्या जिव्हारी


अजमेरमध्ये प्रवेश करतानाच भगव्या रंगाचा मोठा फलक दिसतो. पृथ्वीराज चौहान यांच्या पवित्र जन्मभूमित आपलं स्वागत. या फलकाआड अजमेर हा शब्द दडून गेला. सरकारच्या छोट्या छोट्या कृतीची ही झलक. हा मतदारसंघ भाजपचा गड मानला गेला. परंतू नुकत्याच झालेल्या लोकसभा पोटनिडणूकीत सांवरलाल जाट यांचा मुलगा पराभूत झाला. त्याठिकाणी काँग्रेसचे रघु शर्मा खासदार झाले. विशेष म्हणजे सांवरलाल जाट हे केंद्रीय मंत्री होते. त्यांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट भाजपच्या बाजूने राहीली नाही, हे वैशिष्टय. तर काँग्रेसचे रघु शर्मा यांनी अजमेर लोकसभेतील सर्वच ८ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेतलं. भाजपला एकाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेता आलं नाही. यावरून नाराजी किती आहे हे दिसून येते. विशेष म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत सचिन पायलट यांनी अजमेरमधून निवडणूक लढविली. इथे पायलट यांचा पराभव झाला. त्याचा वचपा काढण्यासाठी सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांचा दौरा अजमेरला निश्चीत केला. म्हणूनच राहुल गांधी यांनी अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली. अजमेरमध्ये किशनगडमध्ये जाट मोठ्या प्रमाणावर आहेत. तर मसुदा मतदारसंघात अल्पसंख्याक जास्त आहेत. अजमेरमध्ये फिरताना भाजप सरकारनं १ हजार मदरसे बंद केल्याबद्दल अल्पसंख्याक समाजात मोठी नाराजी असल्याचं दिसून आली. त्याचा परिणाम मतदानातून दिसून येईल. मात्र अमित शाह यांनी केलेल्या रोड शो ला मोठा प्रतिसाद मिळाला. काँग्रेसनं केलंलं चुकीचं तिकीट वाटपामुळे भाजपला काहीसा फायदा होईल. अमित शाह यांनी अजमेरमध्ये जास्त लक्ष घातलं. भाजपच्या रोड शो ला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतू त्याचं मतात किती रूपांतर होईल हे पाहावं लागेल. 


 
ग से गणेश


राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी हे अजमेरचेच. वासुदेव देवनानी अत्यंत सामान्य कार्यकर्त्यासारखे वागताना दिसतात. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणं ही त्यांची खासीयत. मग तिथे आपण मंत्री आहोत हे सुद्धा विसरतात. त्यामुळे वासुदेव देवनानी यांच्याबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती आहे. त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार शिक्षणात धार्मिक मुद्द्यांचा सहभाग असायला हवा. कारण आयक्यू बरोबरच ईक्यू पण हवा. मी विचारलं ईक्यू म्हणजे काय. त्यावर देवनानी म्हणाले, ईक्यू म्हणजे इमोशनल आणि स्पिरिच्युअल क्वोशंट. मी म्हणाले, ते कसं होईल. देवनानी म्हणाले, हम पहले क से कबूतर, ख से खरगोश, ग से गधा ऐसे सिखते थे लेकीन अब क से कम्प्युटर, ख से खगोल और ग से गणेश सिखना चाहिए. यही भविष्य की शिक्षा है. मी म्हणालो, क से कम्प्युटर, ख से खगोल ठिक है लेकीन ग से गणेश बतानेसे दुसरे धर्म के बच्चों का क्या होगा. त्यावर ते म्हणाले, त्यांनी पण ग से गणेश म्हणायला पाहीजे. वासुदेव देवनानी यांच्यासमोर आपला मतदारसंघ राखण्याचं आव्हान आहे.


सिंधी मतदार कुणाकडे


अजमेरमध्ये सिंधी मतदारांचा चांगला प्रभाव आहे. अजमेर शहरातील पूर्व आणि पश्चिम मतदारसंघात ३० - ३२ हजार मतदार आहेत. तर राजस्थानमध्ये ५ लाख सिंधी मतदार आहेत. इथे राजकीय पक्ष नव्हे तर सिंधी पंचायत बसून तिकीट कोणत्या उमेदवाराला द्यायचे हे निश्चीत करते. सिंधी समाजाची सिंधी सत्कार समिती या ठिकाणी आहे. तेच काँग्रेस आणि भाजपला सांगते की कोणता उमेदवार द्यायचा ते सांगते. त्यानुसार ते ते पक्ष उमेदवार देतात. परंतू पक्षांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही तर सर्व सिंधी समाज एकत्र येऊन समितीने ठरवलेल्या उमेदवाराला एकगठ्ठा मतदान करतो. सिंधी समाजात तेवढी एकी आहे.


त्यामुळे १९५७ पासून या दोन्ही मतदारसंघात केवळ सिंधी उमेदवारच निवडून येतो. सर्वात पहिली निवडणूक पहुमल यांनी लढविली. त्यानंतर नवललाल बच्चानी, भगवानदास शास्त्री, किशन मोटवाणी, दादा अर्जुन दास निवडून आले. नानकराम जगतराय यांची तर चप्पलचे दुकान होते. ते दर्गा बाजारात काम करत असे. अशोक गहलोत यांनी नानकराम यांना काँग्रेसकडून तिकीट दिले. ते विजयी झाले. चप्पलेचे दुकान असणारे नानकराम आमदार झाले. त्यानंतर राजकारणात अजिबात सहभाग नसलेले नरेंद्र सहाणी यांना निवडणूकीत उभे केले. ते पण आमदार झाले. अशा आश्चर्यकारक कथा अजमेरमध्ये पाहायला मिळतात. यावेळेस सिंधी पंचायतने काँग्रेसला विनंती केली होती की दिपक हसानी यांना उमेदवारी द्यावी. परंतू काँग्रेसने ऐकले नाही. त्यामुळे सिंधी समाज नाराज झाला. त्याचा परिणाम अजमेर शहरातील दोन मतदारसंघावर पडणार हे नक्की.


पुष्करची ओळख नष्ट होतेय


अजमेर जवळच १५ मिनिटांच्या अंतरावर पुष्कर आहे. पुष्करमध्ये ब्रम्हाचं एकमेव मंदिर आहे. परंतू आणखी दुसरी ओळख म्हणजे आशिया खंडात सर्वाधिक गुलाबाची शेती याच भागात होते. इथे पिंक गुलाबाची शेती मोठया प्रमाणावर आहे. पिंक गुलाब म्हणजे देशी गुलाब. पिंक गुलाबाला सुगंध असतो. त्यामुळे पिंक गुलाबापासून गुलाबजल, अत्तर आणि गुलकंद बनवता येतं. तर लाल गुलाब फक्त भेट देण्यासाठी उपयोगी येतो. अजमेर शरीफ दर्गा येथे गुलाबाच्या पाकळ्या वाहिल्या जातात त्या पुष्करमधूनच नेल्या जातात. शिवाय गुलकंद आणि गुलाबजल बनवणारे उद्योग पुष्करला मोठ्या प्रमाणावर आहेत. गुलाबाची शेती पाहण्यासाठी गेलो. तिथे सुरजनाथ नावाचे शेतकरी भेटले. सुरजनाथ यांचे वडील, आजोबा गुलाबाची शेती करत होते. त्यांच्याकडे मागील वर्षी १५ एकर मध्ये गुलाब लावले होते. परंतू आता ६ एकरमध्ये गुलाब लावले. याचं कारण मी त्यांना विचारलं तर सुरजनाथ म्हणाले, ''गुलाबाची शेती कमी होत चाललीय. एक एकर गुलाबाच्या शेतीसाठी १० टँकर पाणी हवंय. परंतू इथे पाणीच उपलब्ध नाही. सरकारला आम्ही अनेकवेळा सांगितलं की काहीतरी करा. परंतू जलसाठे सुद्धा सरकारने केले नाहीत. त्यामुळे गुलाब उत्पादन करणारा शेतकरी मरतोय.''


पाण्याची समस्येनं गंभीर रूप धारण केलंय. एक एकरमध्ये १ लाख रूपयांचे उत्पन्न निघते.परंतू लहान मुलाप्रमाणे गुलाबाची काळजी घ्यावी लागते. शेतक-यांच्या घरी पाहुणे आले तरी त्यांना सोडून गुलाब तोडण्याचं काम करावं लागतं.  सुरजनाथ हताश होऊन म्हणाले, ''अटल बिहारी वाजपेयी यांनी नद्या जोडण्याचं स्वप्न होतं. पण तसं झालं नाही. नद्या जोडल्या असत्या तर आम्हाला फायदा झाला असता. इथे भाजप आमदार सुरेश सिंग रावत आहे. किमान त्यानं तर वाजपेयींचं स्वप्न आठवावं.''


शेतक-यांशी चर्चा केल्यावर मी गुलकंद उद्योजकांकडे गेलो. तिथे दीपेंद्र सिंग यांच्याशी भेट झाली. दीपेंद्र सिंग यांच्याकडे रोज सकाळी गुलाब येते. त्यानंतर त्याचं ते गुलाबजल बनवतात. मी त्यांना विचारलं की, गुलाबजल करण्यासाठी किती गुलाबाची आवश्यकता असते. त्यांनी उत्तर दिले. ४० किलो गुलाब आणि ८० किलो पाणी एका मोठ्या भांड्यात टाकले जाते. त्यात एकूण  १२० किलो वजन होतं. त्यातून २० लीटर गुलाबजल येते. मी म्हणालो, यातून चांगला फायदा होतो तर. त्यावर दीपेंद्र म्हणाला, पण आता गुलाब कमी येतात. अगोदर २० हजार - ५० हजार किलो गुलाब येत होता. आत्ता ६ हजार किलो गुलाब येतात. पाऊस कमी झाल्यामुळे २० टक्के शेती राहीली आहे. ७० टक्के शेती बंद पडली. तर गुलाबावर उद्योग चालवणारे केवळ १० टक्के उरले आहेत. इथे जलसिंचन कमी आहे. ७००,८०० मीटरवर पाणी लागत नाही. मी विचारलं यासाठी कारणीभूत कोण आहे, दीपेंद्र म्हणाला, सरकारने पाणी पुरविले नाही. तलाव बनवले नाही. गुलाबाला रोज पाणी पाहीजे. शेतक-यांना नुकसान होतंय. देशी गुलाबाचा भाव दर १५ दिवसाला बदलतो. गुलाब ठेवूनही उपयोग होत नाही.


जीएसटीचा काही परिणाम झाला का, असं दीपेंद्र विचारलं. त्यावर तो म्हणाला, जीएसटी मुळे तर उद्योगाचं कंबरडं मोडलं. जीएसटी मुळे १८ टक्के टॅक्स गुलाबापासून बनवलेल्या वस्तूंवर आला. गुलाबजल, गुलकंद बनवणं महाग झालं. हा उद्योग विश्वासावर चालतो. पूर्वी माल पाठवल्यानंतर दोन-तीन महिन्यांनी पैसे मिळायचे. ते चालत होतं. पण आता माल पाठवण्यापूर्वी जीएसटीचे पैसे खिशातून जातात. माल पाठवल्यावर दोन-तीन महिन्यांनी पैसे मिळतात. परंतू तोपर्यंत तोटाच आहे. दोन-तीन महिने पैसे अडकून पडतात. तेवढेच पैसे बँकेत गुंतवले तर व्याज तरी मिळते. परंतू इथे तसं काहीच मिळत नाही. म्हणून


मॅनुफॅक्चर चे उत्पादन ३०-४० टक्के राहीले. सर्व उद्योगांनी विरोध केल्यामुळे गुलकंद वर १२ टक्के जीएसटी राहीला. परंतू वास्तविक ५ टक्के पाहीजे होते. याचा फटका लहान उद्योगांना बसला. छोटे उद्योग बंद पडत आहेत. गुलाब ही पुष्करची खरी ओळख परंतू आता ही ओळख नष्ट होतेय. 


लोकशाही नव्हे राजेशाही


राजस्थानमध्ये कोणालाही फोन केला तर अगोदर ''जी हुकूम'' असा शब्द ऐकायला मिळतो. इथे राजा महाराजांचा प्रभाव जाणवतो. त्या प्रभावातून अद्यापही जनता बाहेर पडली नाही. जैसलमेर येथे सिंधी मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आहे. हा समाज काँग्रेसचा पारंपारिक मतदार राहीला. त्यांच्याशी गप्पा मारताना विचारलं की, ''इथे महाराणी राजकारणात येणार आहे. मग तुम्ही कोणाला मत देणार. भाजप, काँग्रेस की महाराणी ज्या पक्षात जाईल त्या पक्षाला.'' त्यावर भौरेसिंग म्हणाले, ''आम्ही तर महाराणीला मत देणार.'' मी विचारलं, ''पण महाराणी तुमच्या सुख दुखात कधी आली नाही. मग मत का देणार.'' त्यावर भौरेसिंग म्हणाला, ''उन्होंने हमारे उपर कई वर्षे पहले मेहरबानी की है. उनके छत के नीचे हमे रहे है.'' मी म्हणालो ''लेकीन अभी आजादी मिली है, लोकतंत्र है.'' त्यावर भौरेसिंग म्हणाले, ''लोकतंत्र से हमे कुछ नही है. हम पर उनका उपकार रहा है, हम महाराणी को ही वोट देंगे.'' त्यामुळे राजघराण्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे हे ही विसरता येणार नाही. वसुंधऱा राजे यांचा मुलगा दुष्यंत सिंग हा प्रचार करत असताना साठीच्या पुढचे लोक त्याच्या पाया पडत होते. तर दुष्यंत सिंग हे त्यांना आशिर्वाद देत होते. मुलाच्या वयाच्या दुष्यंत सिंग यांच्या पाया पडण्यात लोकांना गैर वाटत नव्हतं आणि आपला राजेपणा मिरवण्यात दुष्यंत सिंग यांना गैर वाटत नव्हतं. त्यातून राजस्थानमध्ये लोकशाही ऐवजी राजेशाही किती दृढ झालीय हे पाहायला मिळतं.



राजा हो या भिखारी, सबको है पैसे की बिमारी


वसुंधरा राजे यांच्या मतदारसंघात वसीयत सुब्रतीखां नावाचा व्यक्तीशी भेट झाली. त्याला मी विचारलं, ''इसबार किसकी सरकार आएगी.'' तो म्हणाला, ''जिसके पास ज्यादा पैसे है उसकी.'' मी विचारलं ''कसं काय,'' त्यावर वसीयत म्हणाला, ''राजा हो या भिखारी, सबको है पैसे की बिमारी.'' या एका ओळीत वसीयत यांनी संपूर्ण सत्ताकारणाचं सार सांगितलं. वसुंधरा पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी का धडपड करत आहेत. सचिन पायलट का प्रचार करत फिरतोय, कौन बनेगा करोडपती नंतर कळेल, असं अशोक गहलोत का म्हणत आहेत. राहुल गांधी, अमित शाह, नरेंद्र मोदी जीव तोडून का प्रचार करताहेत.. याचं उत्तर वसीयत यांच्या त्या एका ओळीत आहे. राजस्थानचा मतदार मतदान करताना बरोजगारी, कर्जमाफी, उद्योगावरील परिणाम या मुद्द्यांचा विचार करणार आहे. परंतू हे मुद्दे असले तरी मोडतोडीच्या राजकारणात काहीही अशक्य नसतं. तिसरी आघाडीला चांगल्या जागा मिळाल्या आणि भाजपला पाठींबा दिला तर जनभावना सरकारविरोधी असतानाही पुन्हा भाजपचं सरकार स्थापन होऊ शकतं. परंतू सध्या राजस्थानमध्ये काँग्रेसच्या बाजूनं हवा आहे. सत्ताबदलाचा नियम राहतो की अपवाद होतो, हे निकालातून कळेल.