नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर आता सर्वांच्या नजरा नव्या मंत्रिमंडळावर खिळल्या आहेत. नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यानंतर नव्या मंत्रिमंडळातील नावांची घोषणा केली जाईल. यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती अमित शहा यांची. अमित शहा यांच्यासह अनेक नवे चेहरे केंद्रीय मंत्रिमंडळात पाहायला मिळू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे आतापर्यंत मोदी सरकारमधील महत्त्वाचा चेहरा असणारे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या मंत्रिमंडळातील सहभागाविषयी मात्र साशंकता व्यक्त केली जात आहे. हे दोन्ही नेते प्रकृतीच्या कारणामुळे पुन्हा एकदा मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळू शकतील की नाही, यावर अजूनही चर्चा सुरु आहे. २०१४ साली अमृतसर लोकसभा मतदारसंघात अरुण जेटली यांचा पराभव झाला होता. यानंतर ते राज्यसभेवर निवडून गेले होते. तर सुषमा स्वराज गेल्यावेळी मध्य प्रदेशच्या विदिशा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. मात्र, यंदा या दोन्ही नेत्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. 


त्यामुळे या दोन्ही नेत्यांची कसर भरून काढण्यासाठी भाजपकडून नव्या चेहऱ्यांचा शोध घेतला जात आहे. यापैकी राजनाथ सिंह यांच्याकडे कृषीखाते सोपवले जाऊ शकते. तर राफेल प्रकरणात सरकारचा भक्कम बचाव करणाऱ्या निर्मला सितारामन यांच्याकडे पुन्हा एकदा संरक्षण मंत्रिपदाचा कारभार दिला जाऊ शकतो. तर मोदींचा उजवा हात असणाऱे अमित शहा यांच्याकडे केंद्रीय गृहखात्याचा कारभार दिला जाऊ शकतो. अमेठीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव करून ‘जायंट किलर’ ठरलेल्या स्मृती इराणी यांच्याकडे कोणते महत्त्वाचे खाते दिले जाईल, याबाबतही उत्सुकता आहे. विद्यमान वस्त्रोद्योगमंत्रिपदावरून इराणी यांना बढती मिळेल, हे निश्चित मानले जात आहे. तर गेल्या पाच वर्षांमध्ये मोदी सरकारमधील अत्यंत कार्यक्षम मंत्री असा लौकिक कमावणाऱ्या नितीन गडकरी यांनाही आणखी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. तसेच रविशंकर प्रसाद, पीयूष गोयल, नरेंद्र सिंह तोमर, प्रकाश जावडेकर यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. 


याशिवाय, एनडीएतील महत्त्वाचे घटकपक्ष असणाऱ्या शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाकडे कोणती मंत्रिपदे येणार, याचीही सर्वांना उत्सुकता आहे. गेल्यावेळी पंतप्रधान मोदींनी केवळ एका मंत्रिपदावर शिवसेनेची बोळवण केली होती. यावेळी मात्र, आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन शिवसेनेला अधिक मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.