Chandrayaan-3 Sleeping: चांद्रयान-3 चं विक्रम लँडर चंद्रावर ज्याठिकाणी उतरलं  त्या ठिकाणाला शिवशक्ती पॉईंट असं नाव देण्यात आले आहे. या पॉइंटवरच विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडला. मात्र, शिवशक्ती पॉईंटसह चंद्राच्या पृष्ठभागावर प्रज्ञान रोव्हर देश आणि इस्त्रोची छाप सोडू शकलेला नाही. असे असले तरी प्रज्ञान रोव्हरने आपल्या संशोधनात चंद्रावरील अनेक रहस्य उलगडली आहे. 


प्रज्ञान रोव्हरच्या चाकांवर अशोकस्तंभ आणि इस्त्रोचे चिन्ह


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावले. श्रीहरिकोटामधल्या स्पेस सेंटरमधून दुपारी बरोब्बर 2 वाजून 35 मिनिटांनी रॉकेट चंद्राकडे झेपावलं. LVM 3 या लाँच व्हेईकलमधून चांद्रयानाचं प्रक्षेपण करण्यात आलं. यानंतर 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 ने  चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. त्यानंतर विक्रम लँडरमधून 6 पायांचा प्रज्ञान रोवर बाहेर पडला. लँडरचा एक दरवाजा घसरगुंडीसारखा उघडून त्यावरुन प्रज्ञान रोव्हर बाहेर आला. लँडरकडून कमांड मिळताच प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरला. रोव्हरच्या चाकांवर अशोकस्तंभ आणि इस्त्रोचे चिन्ह कोरण्यात आले आहे. त्यामुळे प्रज्ञान रोव्हर जसे पुढे पुढे सरकेल तेव्हा त्यांच्या मागच्या चाकांची छाप चंद्राच्या पृष्ठभागावर उमटली. त्यामुळे ही दोन्ही चिन्हे चंद्रावर भारताच्या अस्तित्वाचा कायमचा पुरावा सोडतील असा या मागचा उद्देश होता.


का सोडू शकला नाही देश आणि इस्त्रोची छाप?  


विक्रम लँडरमधून 6 पायांचा प्रज्ञान रोवर बाहेर पडल्यानंतर त्याने चंद्रावर भ्रमण केले. प्रज्ञान रोव्हर चंद्रावर फिरत असताना रोव्हरच्या चाकांवर कोरण्यात आलेल्या अशोकस्तंभ आणि इस्त्रोचे चिन्ह यांचे ठसे चंद्राच्या पृष्ठभागावर उमटले नाहीत. चंद्राच्या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी प्रज्ञान रोवरने भ्रमण केले त्या ठिकाणचा पृष्ठभाग हा खडकाळ आणि खडबडीत आहे. तसेच येथे माती सारखा मऊ पृष्ठभाग नाही. यामुळे रोव्हरच्या चाकांवर कोरण्यात आलेल्या अशोकस्तंभ आणि इस्त्रोचे चिन्ह यांचे ठसे चंद्राच्या पृष्ठभागावर सर्वत्र स्पष्टपणे उमटू शकले नाहीत अशी माहिती संशोधनात समोर आली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर आपली छाप सोडता आली नसली तरी चंद्रावरील तापमान, हवामान, चंद्रावर होणारे भूकंप तसेच ऑक्सिजन, आर्यन तसेच इतर खनिजे या संदर्भातील भरपूर डेटा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने  गोळा केला आहे. 


विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीपमोडवर


चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीपमोडवर आहेत. चंद्रावर नवा सूर्योदय झाला आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचे रिसीव्हर ऑन आहेत.  22 सप्टेंबरपासून इस्रोची टीम विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. चांद्रयान 3 च्या विक्रम लँडर आणि रोव्हरकडून अद्याप कोणताही सिग्नल मिळालेला नाही. संपर्क करण्याचा प्रयत्न सुरुच राहणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे.