नवी दिल्ली : सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेल्या 'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोठा मुलगा अजय यांना कांता प्रसाद बेशुद्ध अवस्थेत आढळले, त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजय प्रसाद म्हणाले की, 'कांता प्रसाद गुरुवारी सकाळी 6.30 च्या सुमारास घराबाहेर पडले होते. त्यावेळी ते खूप अस्वस्थ होते. दारू पिऊन बाबांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्याची माहिती मिळाली आणि लोकांची क्षमा मागून ते त्यांच्या ढाब्यावर आले आणि झोपी गेले. ते बेशुद्ध झाले होते. त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.'


कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न?


झी न्यूजशी खास बातचीत करताना अजय प्रसाद यांनी सांगितले की, 'YouTuber गौरव वासन आणि बाबांमधील वादामुळे लोकं माझ्या वडिलांना त्रास देत असत. लोकांच्या शिव्या ऐकल्यानंतर ते अस्वस्थ झाले, ज्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले.


'बाबा बरेच दिवस दररोज दारु पित होते'


बाबा आणि त्यांच्या पत्नीला दररोज ढाब्यावर आणणार्‍या ऑटो चालक सतीशने झी २४ ताशची बोलताना सांगितले की, 'बाबा गेल्या कित्येक दिवसांपासून दररोज मद्यपान करत होते. बुधवारीही बाबांनी भरपूर मद्यपान केले. मीच त्यांना ढाब्यावरुन घरी आणले. पण त्यांनी हे पाऊल उचलले.'


पोलिसांना रुग्णालयातून मिळाली माहिती 


दिल्ली पोलिसांनी सांगितले की, त्यांना रुग्णालयातून कांता प्रसाद यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची माहिती मिळाली. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कांता प्रसाद यांची पत्नी बदामी देवी यांनी पोलिसांना सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली होते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि आत्महत्या करण्यामागील कारण काय होते हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.