`राम मंदिरासाठी ट्रस्ट, मग मशिदीसाठी का नाही?` शरद पवारांचा सवाल
अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठीच्या ट्रस्टची पहिली बैठक होत असतानाच शरद पवारांनी मशिदीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
लखनऊ : अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठीच्या ट्रस्टची पहिली बैठक होत असतानाच शरद पवारांनी मशिदीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट बनवण्यात येते, मग मशीद बांधण्यासाठी ट्रस्ट का बनवत नाही? देश तर सगळ्यांचा आहे, सगळ्यांसाठी आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. लखनऊमध्ये एका कार्यक्रमात शरद पवारांनी असं वक्तव्य केल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे. लखनऊमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनाला शरद पवार उपस्थित होते.
दिल्लीमध्ये आज श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची पहिली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महंत नृत्यगोपाल दास यांना ट्रस्टचं अध्यक्ष नेमण्यात आलं, तर विश्व हिंदू परिषदेच्या चंपत राय यांची महामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा भवन निर्माण समितीचे अध्यक्ष असतील. गोविंद गिरी यांना कोषाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष के. पसारण यांच्या नेतृत्वात या बैठकीला सुरुवात झाली.
बैठकीला कोणाची उपस्थिती
महंत नृत्यगोपाल दास
महंत दिनेंद्र दास
गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव ज्ञानेश कुमार
होमिओपथी डॉक्टर अनिल कुमार मिश्रा
चंपत राय (व्हीएचपी)
शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती
उत्तर प्रदेश अपर प्रधान गृहसचिव अवनीश अवस्थी
परमानंद महाराज
अयोध्या जिल्हाधिकारी अनुज झा
कामेश्वर चौपाल
पेजावर मठाचे प्रमुख विश्वप्रसन्न तीर्थ स्वामी
पुण्याचे स्वामी गोविंद देवगिरी
अयोध्या राज परिवाराचे विमलेंद्र मोहन मिश्र