दिग्विजय सिंह यांनी सांगितलं ज्योतिरादित्य सिंधियांच्या नाराजीचं हे कारण
मध्य प्रदेशात काँग्रेसचं कमलनाथ सरकार अडचणीत आणणाऱ्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या काँग्रेसमधील नाराजीचं कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योजिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं आहे.
भोपाळ : मध्य प्रदेशात काँग्रेसचं कमलनाथ सरकार अडचणीत आणणाऱ्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या काँग्रेसमधील नाराजीचं कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योजिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याचा प्रस्ताव होता, पण त्यांनी त्यांच्या समर्थकासाठी उपमुख्यमंत्रिपद हवं होतं.
उपमुख्यमंत्रिपदी सिंधियांचा चेला स्वीकारण्यास कमलनाथ यांनी नकार दिला, असा गौप्यस्फोट दिग्विजय सिंह यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत केला.
ज्योतिरादित्य यांना काँग्रेसनं राज्यसभेची उमेदवारी दिली असती, पण अतिमहत्वाकांक्षी सिंधिया यांना केवळ मोदी-शाह केंद्रात मंत्रिपद देऊ शकतात, असं दिग्विजय म्हणाले.
बंडखोर आमदारांबाबत दिग्विजय सिंह यांचा हा दावा
मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या २२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे पाठवले असले तरी २२ पैकी १३ आमदारांनी काँग्रेससोबत राहणार असल्याचं सांगितलं आहे, असा दावा दिग्विजय सिंह यांनी केला आहे. कमलनाथ सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकेल असा विश्वासही दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केलाय.
मध्य प्रदेशच्या राजकारणात कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य सिंधिया असे तीन प्रमुख गट होते. मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर कमलनाथ आणि दिग्विजय सिंह एकत्र आले.
वर्ष-सव्वा वर्षाच्या कालावधीत या सिंधिया नाराज होते. मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर दिग्विजय आणि ज्योतिरादित्य यापैकी कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता होती.
कमलनाथ यांनी दिग्विजय यांना झुकतं माप दिल्याचं लक्षात येताच सिंधिया आणखीच नाराज झाले आणि त्यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंडाचा झेंडा फडकावला.