राजस्थानच्या शाहपुरा जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पतीच्या मृत्यूचा धक्का बसल्यानंतर पत्नी आणि मुलाने जीव सोडला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तिन्ही मृतदेह आपल्या ताब्यात घेतले. पोलिसांचं म्हणणं आहे की, तिन्ही मृतदेहांचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर नेमकं कारण स्पष्ट होईल. दरम्यान एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहपुरा जिल्ह्यातील कोत्री उपविभागातील बडलियास गावचे माजी उपसरपंच सत्यनारायण सोनी शनिवारी सकाळी शेतात गेले होते. यादरम्यान ते अचानक बेशुद्ध झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या धक्क्यामुळे सत्यनारायण सोनी यांची पत्नी ममता आणि मुलगा आशुतोष बेशुद्ध झाले.


एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूमुळे शोककळा


पत्नी आणि मुलगा बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्या दोघांचाही मृत्यू झाला. सत्यनारायण यांच्या चितेची राख अद्याप थंड झालेली नसतानाच रविवारी सकाळी आणखी दोन चितांना अग्नी देण्याची वेळ आली. एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याचं समजल्यानंतर अनेकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते. रविवारी दुपारी आई आणि मुलाची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी सगळा गाव लोटला होता. 


काही दिवसांपासून सावकारांमुळे होते त्रस्त


ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सत्यनारायण सोनी हे गेल्या काही दिवसांपासून सावकारामुळे त्रस्त होते. या कुटुंबातील तिघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे पोलीस तपासातच समोर येईल. त्याचवेळी पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे. तिघांच्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होईल, असं बदलियास पोलीस ठाण्याचे अधिकारी सिद्धार्थ प्रजापत यांनी सांगितलें. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.