ज्या जिवलग मित्रानं परदेशात राहायला जागा दिली त्याच्या पत्नीशीच संबंध ठेवून त्याचाच केला घात
Crime News: मागील 7 वर्षांपासून या प्रकरणाचा तपास सुरु होता. अखेर या प्रकरणात पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं असून आरोपींना कोर्टाने दोषी ठरवलं आहे.
Crime News: उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथील एनआरआय सुखजीत सिंग उर्फ सोनूच्या हत्येप्रकरणी कोर्टाने त्याची पत्नी रमनदीप कौर आणि तिचा प्रियकर मिठ्ठू यांना दोषी ठरलं आहे. या दोघांना अद्याप शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. लहानपणापासून सुखजीतचा मित्र असलेल्या मिठ्ठूने त्याच्या जिवलग मित्राच्या पत्नीला केवळ व्याभिचारासाठी प्रोत्साहन दिलं असं नाही तर दुबईवरुन भारतात येऊन आपल्या मित्राची हत्याही केली. बंडा येथील बसंतापूरचा मूळ रहिवाशी असलेल्या सुखजीत सिंग इंग्लंडमध्ये वास्तव्यास होता. जुलै 2016 तो आपल्या कुटुंबासहीत भारतात आला होता. तो त्याच्या फार्म हाऊसवर वास्तव्यास होता.
गळा चिरुन हत्या
सुखजीत सिंगची हत्या 1 सप्टेंबर 2016 रोजी करण्यात आली. 2 सप्टेंबरच्या पहाटे सुखजीत सिंगची ब्रिटीश पत्नी रमनदीपच्या आवाजाने नातेवाईकांना जागा आली तेव्हा सुखजीत सिंगचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. समोरचं दृष्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. काही वेळातच आजूबाजूच्यांनी घरात गर्दी केली. सुखजीत सिंग राहत असलेल्या फार्म हाऊसच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये सुखजीत सिंगचा मृतदेह पडला होता. सुखजीत सिंगचा गळा धारधार शस्त्राने चिरण्यात आलेला.
वेगवेगळ्या रुममध्ये झोपल्याचा दावा
रमनदीपने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ती आणि सुखजीत सिंग वेगवेगळ्या रुममध्ये झोपले होते. सकाळीच आपल्याला सुखजीत सिंगची हत्या झाल्याचं समजलं असं रमनदीप म्हणाली. सुखजीत सिंगने कुत्रेही पाळले होते. मात्र हे कुत्रे नशा चढल्याप्रमाणे सुस्तावलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले. सुखजीत सिंगचं कोणाशीही काहीही भांडण किंवा वाद नव्हता. त्यामुळेच पहिली संशयाची सुई रमनदीपकडेच होती.
तो त्याच परिसरामध्ये होता
पोलिसांनी तपास केला असता त्यांना सुखजीत सिंगचा मित्र मिठ्ठू दुबईवरुन भारतात आला होता. मिठ्ठू बेपत्ता होता. रमनदीपने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मिठ्ठू पुन्हा दुबईला निघून गेला होता. पोलिसांनी खबऱ्यांच्या हवाल्याने काढलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी सुखजीत सिंगची हत्या झाली त्यादिवशी मिठ्ठू बंडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बसंतापूरमध्येच होती.
एकमेकांवर होतं प्रेम
यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने मिठ्ठू दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला ताब्यात घेतलं. मिठ्ठूला अटक झाल्यानंतर सुखजीत सिंगच्या मृत्यूचं सत्य समोर आलं. मिठ्ठूने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याचं आणि सुखजीत सिंगची पत्नी रमनदीपचं एकमेकांवर प्रेम होतं. आम्ही दोघांनी मिळून सुखजीत सिंगचा काटा काढला असंही मिठ्ठूने सांगितलं.
वर्गमित्र होते दोघेही
मिठ्ठू कपूरथला (पंजाब) जिल्ह्यातील सुल्तानपूर लोधी येथील जैनपूरमध्ये राहत होता. सुखजीत आणि मिठ्ठू जालंदरमधील शाळेत एकत्र शिकले होते. दोघेही चांगले मित्र होते. सुखजीत सिंगची आई वंश कौर यांनी त्याला त्याची बहीण कुलविंदर कौरकडे म्हणजेच इंग्लंडमध्ये डर्बीशायर येथे शिक्षणासाठी पाठवलं. सुखजीत सिंग तिथे टँकर चालक म्हणून काम करु लागला. याचवेळी त्याचं आणि रमनदीप कौर यांचं प्रेमप्रकरण सुरु झालं. रमनदीपचे नातेवाईक या लग्नाच्याविरोधात होते. मात्र रमनदीपने सुखजीत सिंगबरोबर लग्न केलं. त्यानंतर हे दोघे एका वर्षासाठी बसंतापूर येथे येऊन राहिले. नंतर ते पुन्हा इंग्लंडला गेले.
दुबईत रचला हत्येचा कट
दुसरीकडे मिठ्ठू दुबईला जाऊन नोकरी करु लागला. मिठ्ठूने लग्न केलं नाही. मिठ्ठू आणि सुखजीत सिंगचं आधूनमधून बोलणं व्हायचं. याच माध्यमातून मिठ्ठू आणि रमनदीप कौर यांच्यामध्ये फोनवर गप्पा होऊ लागल्यानंतर ते सोशल मीडियावरुन एकमेकांशी कनेक्ट झाले. यानंतर जेव्हा मिठ्ठू इंग्लंडला जायचा आणि सुखजीत सिंग दुबईला जायचे ते एकमेकांच्या घरीच थांबायचे. याच दरम्यान रमनदीप कौर आणि मिठ्ठूमधील जवळीक वाढली. दुबईमध्येच सुखजीत सिंगच्या हत्येचा कट या दोघांनी रचला.
तिघेही भारतात आले...
या दोघांनी ठरवलेल्या प्लॅननुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये रमनदीप कौर पतीबरोबर दुबईमध्ये मिठ्ठूच्या घरी पोहोचली. तिथे हे दोघे 15 दिवस राहिले. 28 जुलै रोजी सुखजीत आणि रमनदीप कौर मुलांसहीत बसंतापूरमध्ये आले. मिठ्ठू सुद्धा त्यांच्याबरोबर आला होता. त्यानंतर हे लोक भारतामध्ये वेगवगेळ्या ठिकाणी फिरले. 15 ऑगस्ट रोजी सर्वजण बसंतापूरला पोहोचले.
...अन् हत्या केली
31 ऑगस्ट रोजी मिठ्ठूने दुबईला जातोय असं सांगून तो निघून गेला. सुखजीत सिंग आणि रमनदीप कौर हे अमृतसर विमानतळावर सोडायला गेले. परत येताना रमनदीपने सुखजीत सिंगवर धारधार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये तिला यश आलं नाही. तिने यासंदर्भात मिठ्ठूला कळवलं. सुखजीत सिंगने बदनामीच्या भीतीने आरसा लागल्याचं सांगत इलाज करुन घेतला. त्यानंतर मिठ्ठू दुबईवरुन परथ आला. त्याने रमनदीपच्या मदतीने 1 सप्टेंबर 2016 रोजी संध्याकाळी सुखजीत सिंगचे नातेवाईक आणि कुत्र्यांना गुंगीचं औषध देऊन रात्री सुखजीत सिंगची हत्या केली.