Trending News In Marathi: पती-पत्नींमधील भांडणे हे काही नवीन नाही. कोणत्या न कोणत्या कारणांवरुन नवरा-बायकोमध्ये वाद हे होतच असतात. मात्र, आग्रामध्ये पती-पत्नीमधील भांडणाचे कारण ऐकून तुम्हीही डोक्यावर हात माराल. पोलिसही वादाचे कारण ऐकून हैराण झाले आहेत. लग्नाच्या आठ महिन्यांतच त्यांचे लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे. पती-पत्नीचे भांडण पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर दोघांनी समजवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचाही काहीच परिणाम झाला नाही. पत्नीच्या हट्टापुढे समुपदेशकानेही हात टेकले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आग्रा येथील कौटुंबिक समुपदेशन केंद्रात रविवारी एक विचित्र घटना घडली आहे. मंटोला येथील एका तरुणाच्या लग्नाला 8 महिने झाले होते. त्याची पत्नी सीकरी येथील आहे. तरुणाच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर पत्नी मशेरी लावत असल्याचे लक्षात आले. ती दिवसातून तीन ते चारवेळा मशेरी लावायची. पत्नीच्या या सवयीला वैतागलेल्या पतीने तिला मशेरी लावण्यापासून रोखले. 


पतीने मशेरी लावण्यापासून रोखल्यानंतरही पत्नीने त्याचे काहीच ऐकले नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादानंतर पत्नी माहेरी निघून गेली. तेव्हापासून ती घरीच आहे. पतीने तिला पुन्हा परत जाण्यासाठी आग्रह केला. मात्र एक अट ठेवली ती म्हणजे मशेरी सोडणार नाही. यावरुन त्यांच्यात पुन्हा वाद झाला आहे. 


पती-पत्नीमधील वाद इतके विकोपाला गेला की हे भांडण थेट पोलिस ठाण्यातच गेले. पोलिसांनी या पत्नीच्या तक्रारीनंतर हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशनक केंद्रात वर्ग केले. मात्र तरीकाही ती तिचा हट्ट सोडायला तयार नव्हती. या प्रकरणावर दुसऱ्यांदा सुनावणी ठेवण्यात आली. तेव्हा पत्नीने म्हटलं की ती मशेरी लावणं सोडू शकत नाही. एकवेळ पतीला सोडू शकते मात्र हे व्यसन सोडू शकत नाही. पत्नीच्या या विचित्र हट्टाला पाहून समुपदेशकांनीही डोक्याला हात लावला आहे. या प्रकरणाची सुनावणीसाठी आता पुढची तारीख निश्चित केली आहे. 


आत्तापर्यंत तुम्ही पतीच्या व्यसनाला वैतागलेल्या पत्नींबाबत ऐकलं असेलच पण पत्नीचा हा अजबच हट्ट ऐकून परिसरातही एकच चर्चा होत आहे. पण मशेरी हा तंबाखूजन्य पदार्थ असून तो शरीरासाठी घातक असतो. त्यामुळं कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. पण आता या प्रकरणात दोघांचा घटस्फोट होईल की पत्नी हट्ट सोडून देईल हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.