नवी दिल्ली : कर्नाटकचे मंत्री आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा मुलगा एच डी रेवन्ना यांनी निवडणूक निकालांवर आपलं मत व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर राजकारण सोडून देईन, असं वक्तव्य रेवन्ना यांनी केलंय. एच डी रेवन्ना कर्नाटक सरकारमध्ये लोक निर्माण कार्य मंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेवन्ना यांच्या म्हणण्यानुसार, राज्यात १८ एप्रिल रोजी निवडणुका होणार आहेत आणि अंकशास्त्राप्रमाणे ही तिथी यूपीएसाठी अनुकूल आहे. 


कुमारस्वामी आणि एच डी रेवन्ना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विश्वासघात केलाय, असं म्हणत एच डी रेवन्ना यांनी पंतप्रधानांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 'देशासाठी मोदींनी काय योगदान दिलंय? आज मी जे म्हणतोय ते लिहून ठेवा... कारण मी पुन्हा तुमच्यासमोर येईल. जर मोदी पुन्हा देशात निवडून आले तर मी राजकारण सोडून देईन' असं म्हणत लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान नसतील असंच भाकीत त्यांनी वर्तवलंय.


रेवन्ना यांचा यामागचा तर्क अंकशास्त्रावर आधारीत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वेळी कर्नाटक निवडणुका २०१८ मध्ये झाल्या होत्या. १८ म्हणजेच १ आणि ८... म्हणजे ९... याच अंकगणितानं कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले. यावेळी पुन्हा एकदा १८ अंक महत्त्वाचा आहे. त्यामुळे देशात यूपीएची सत्ता पुन्हा प्रस्थापित होईल. 


उल्लेखनीय म्हणजे, एच डी रेवन्ना यांचा ज्योतिष शास्त्रावर अधिक विश्वास आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ते आपल्या भावासोबतच्या अर्थात कुमारस्वामी यांच्यासोबतच्या मतभेदांमुळे चर्चेत आले होते.