राम मंदिराला विरोध केलात तर सरकार पाडू- सुब्रमण्यम स्वामी
राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशातील वातावरण कमालीचे तापले आहे.
नवी दिल्ली: राम मंदिराचे प्रकरण न्यायालयीन सुनावणीसाठी आल्यानंतर केंद्रातील मोदी किंवा उत्तर प्रदेशातील योगी सरकारने विरोधी भूमिका घेतली तर मी त्यांचे सरकार पाडने, असा इशारा भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे. ते शुक्रवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कार्यक्रमात बोलत होते. जानेवारी महिन्यात न्यायालयात राम मंदिराचा मुद्दा पटलावर येईल. त्यानंतर आम्ही हा खटला दोन आठवड्यात सहज जिंकू. तेव्हा आमच्यासमोर केवळ दोनच प्रतिस्पर्धी असतील, एक म्हणजे मोदी सरकार आणि योगी सरकार. हे दोन्ही पक्षकार माझ्याविरोधात भूमिका घेतील का? ते कदापि असे पाऊल उचलणार नाहीत. मात्र, तरीही त्यांनी असे केलेच तर मी त्यांचे सरकार पाडेन, असा इशारा स्वामी यांनी दिला.
आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशातील वातावरण कमालीचे तापले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिंप या संघटनांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी संसदेत अध्यादेश आणण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे सरकारवरील दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्याच महिन्यात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेला अयोध्या दौराही चांगलाच गाजला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी 'पहले मंदिर, फिर सरकार', असा नारा दिला होता. तर सरसंघचालक मोहन भागवत यांनीही राम मंदिराच्या उभारणीसाठी आणखी वाट पाहता येणार नाही असे सांगत लोकांना जनांदोलन उभारण्याचे आवाहन केले होते.