नवी दिल्ली: विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या मिशांना राष्ट्रीय मिशीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली. ते सोमवारी लोकसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात यावा. तसेच त्यांच्या मिशांना राष्ट्रीय मिशीचा दर्जा द्यावा, असे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी चौधरी यांनी भाजप सरकारलाही लक्ष्य केले. गेल्या पाच वर्षांमध्ये तुम्ही टुजी आणि कोळसा घोटाळ्यातील आरोपींना पकडू शकलात का? तुम्ही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना तुरुंगात टाकले का? या सगळ्यांना चोर म्हणत तुम्ही सत्तेवर आलात. मात्र, यानंतर तुम्ही कोणतीही कारवाई केली नाहीत. मग तुम्हाला संसदेत बसण्याचा हक्क आहे का, असा सवाल चौधरी यांनी विचारला. 




पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे विक्रेते आहेत. आम्ही आमचे प्रोडक्ट विकण्यास असमर्थ ठरलो तर दुसरीकडे भाजपाने त्यांच्याकडील खराब प्रोडक्टही चांगल्या रितीने विकली. मोदींनी गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेसच्या योजनांचे नाव बदलण्याचे काम केले. बेरोजगारीच्या समस्येवर सरकारने अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचेही चौधरी यांनी सांगितले.