सावध व्हा... सलग दुसऱ्या दिवशी देशात कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक
३० एप्रिल ते १५ मे हा कालावधी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला (पिक पॉईंट) पोहोचेल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
नवी दिल्ली: एकीकडे सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील केले असतानाच देशभरात कोरोना व्हायरसने (Coroanavirus) मोठी उसळी घेतल्याचे दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे २६४४ नवे रुग्ण आढळून आले. काल देशभरात कोरोनाचे सर्वाधिक २२९३ रुग्ण सापडले होते. मात्र, आज ही पातळीदेखील ओलांडली गेली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने ३९ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, ३९,९८० रुग्णांपैकी २८,०४६ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. १०,६३३ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १३०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ३० एप्रिल ते १५ मे हा कालावधी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला (पिक पॉईंट) पोहोचेल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत अचानक झालेली वाढ पाहता, हा इशारा खरा ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
देशभरात महाराष्ट्र हे सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १२ हजारांच्या पार गेली असून ५०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरात दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ५,०५४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ दिल्लीत कोरोनाचे ४१२२ रुग्ण आहेत.
केंद्र सरकारने नुकताच देशातील लॉकडाऊनचा कालावधी १७ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आँरेंज आणि ग्रीन झोनमधील निर्बंध शिथील करण्यात आले होते. तसेच परराज्यांत अडकलेल्या मजुरांना आपापल्या गावी जाऊन देण्यासाठी सशर्त मंजुरी देण्यात आली होती.