मुरादाबाद : मुरादाबादमध्ये बस स्थानकातून ८ महिन्यांच्या एका बाळाच्या चोरीचं प्रकरण समोर आलंय. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलंय. गलशहीद स्टेशन क्षेत्र परिसरात रोडवेज बस स्थानकात ही घटना घडली. एक महिला आणि एका पुरुषानं मिळून रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या एका महिलेचं मूल पळवलंय. चिमुरड्याच्या आईनं या घटनेची तक्रार पोलिसांत केल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज पडताळलं. त्यानंतर या दोन्ही आरोपींची ओळख पटली असून ते दोघे अद्यापही फरार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, बाळाच्या आईचा आपल्या पतीशी वाद झाल्यानंतर तिच्यावर रस्त्यावर राहण्याची वेळ आली होती. आपल्या ८ महिन्यांच्या चिमुरड्याला घेऊन ही महिला रेल्वे स्टेशन आणि रोडवेजवर कसाबसा आपला उदरनिर्वाह करत होती. 


तिच्यावर लक्ष ठेऊन असलेल्या एक पुरुषानं आणि एका स्त्रीनं या महिलेला गाठलं. मदतीची आणि आपुलकीची भावना व्यक्त करत या दोघांनी तिचा विश्वास संपादन केला. 



महिलेच्या आरोपानुसार, आरोपी महिला-पुरुषानं पाणी पाजण्याच्या निमित्तानं बाळाला आपल्या हातात घेतलं... आणि तिथून निघून गेले. आपलं बाळ परत न आल्यानं महिलेनं लगेचच पोलिसांना गाठलं. 


घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी बाळाचा शोध सुरू केला आणि परिसरात असलेल्या सीसीटीव्हीचं फुटेज धुंडाळलं. यामध्ये आरोपी महिला आणि पुरुष कैद झालेत. परंतु, अद्यापही या बाळाचा आणि आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही. पोलिसांचा तपास सुरु आहे.