घरावर बुलडोझर चालवत असतानाच आग, अधिकाऱ्यांनी JCB ने पाडलेलं छत आई आणि मुलीवर कोसळून जिवंत जळाल्या, संतापाची लाट
Kanpur Dehat Mother Daughter Burned Alive: कानपूर देहात येथे आई आणि मुलगी जिवंत जळाल्याने संतापाची लाट पसरली आहे. अतीक्रमण हटवण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान महिला आणि तिची मुलगी जिवंत जळून मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Kanpur Dehat Mother Daughter Burned Alive: कानपूर देहातच्या रुरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या मडौली गावात अतीक्रमण हटवत असताना झोपडीतील आई आणि मुलीचा जिवंत जळून मृत्यू झाल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पीडित कुटुंब धरणं आंदोलन करत आहे. नातेवाईकांनी हे दोन्ही मृतदेह उचलण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री येणार नाहीत, तोवर मृतदेह स्वीकारणार नाही असा निर्णय त्यांनी घेतला आहे. यासह बुलडोझर चालवणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
मडौली गावचे रहिवासी असणारे कृष्ण गोपाल दीक्षित यांच्यावर गावातील जमिनीवर अतीक्रमण केल्याचा आरोप आहे. जानेवारीत महसूल विभागाने कृष्ण गोपाल यांच्याविरोधात अतीक्रपण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी एसडीएम मैथा ज्ञानेश्वर प्रसाद यांच्या नेतृत्वात महसूल, पोलीस आणि प्रशासन विभाग अतीक्रमण हटवण्यासाठी पोहोचलं होतं.
अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर कृष्ण गोपाल यांच्या झोपडीवर बुलडोझर चालवला. यावेळी अधिकारी आणि कुटुंबीयांमध्ये वाद झाला. यादरम्यान झोपडीत आग लागली आणि या आगीत कृष्णगोपाल यांची पत्नी प्रमिला दिक्षित व 23 वर्षीय मुलगी नेहा जिवंत जळाले.
या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसने ट्विटरला हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत घर आगीत जळून खाक झाल्याचं आणि खाली सर्व सामान पडल्याचं दिसत आहे. तसंच समोर आगीच्या ज्वाळाही दिसत आहेत. तसंच काही लोक रडत असल्याचा आवाज ऐकू येत आहे. हे दोघे कृष्ण गोपाल आणि त्यांचा मुलगा शिवम असल्याचा अंदाज आहे. 'माझी आई जळाली आणि हे सगळे पळून गेले', असं तो या व्हिडीओत सांगत आहे.
या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे. जमावाने सर्व अधिकाऱ्यांना गावातून पळवून लावलं. एका अधिकाऱ्याची गाडीही पलटी करण्यात आली. तणाव वाढत असल्याने घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रकरण वाढत असल्याने मोठे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी ग्रामस्थांना कारवाईचं आश्वासन दिलं आहे.
कुटुंबीयांचा गंभीर आरोप
पीडित कुटुंबाचा आरोप आहे की, ज्यावेळी बुलडोझर चालवण्यात आला तेव्हा कृष्णगोपाल यांची पत्नी आणि मुलगी झोपडीत होते. बुलडोझर चालवण्यात आला तेव्हा झोपडीत आग लागली आणि त्यात दोघी जिवंत जळाल्या. पोलीस आणि प्रशासनानेही यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
पोलिसांचं स्पष्टकरीण
कानपूर देहातचे पोलीस अधिक्षक यांनी सांगितल्यानुसार, एक पथक अतीक्रमण हटवण्यासाठी पोहोचलं होतं. पथकाने कारवाई सुरु करताच महिला आणि तिच्या मुलीने स्वत:ला झोपडीत बंद करुन घेतलं. दोघींचाही मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तपास सुरु आहे. चौकशी केली जात असून जे दोषी आढळतील त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल.
आतापर्यंत काय कारवाई झाली आहे?
घटनेनंतर नातेवाईकांच्या तक्रारीच्या आधारे अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे, त्यामध्ये SDM मैथा ज्ञानेश्वर प्रसाद, रूरा SHO दिनेश कुमार गौतम, अशोक सिंह, JCB ड्रायव्हर दीपक, मड़ौली गावाचे रहिवासी अशोक, अनिल, निर्मल आणि विशाल यांचं नाव आहे. याशिवाय 10 ते 12 अज्ञात सहकारी, 12 से 15 महिला आणि पुरुष पुलिस कर्मचाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.