नवी दिल्ली : देशाच्या राजधानीपासून अवघ्या ६० किलोमीटर दूर असलेल्या बुलंदशहरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी एका महिलेला भरदिवसा सर्वांसमोर झाडाला बांधून मारहाण केली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित महिला किंचाळत होती, ओरडत होती. तिच्या आजूबाजूला इतर नागरीक उपस्थित होते. मात्र, सर्वांनी बघ्याची भूमिका घेतली आणि कुणीही तिच्या बचावासाठी पुढं आलं नाही. उलट उपस्थित नागरीकांनी तिचा बचाव करण्याऐवजी मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली. 


ही घटना बुलंदशहरमधील लोंदा गावात घडली आहे. या ठिकाणी ५०-६० जणांचा जमाव तमाशा पाहत होता. मात्र, पीडित महिलेला होत असलेली मारहाण रोखण्यास कुणीही पुढं आलं नाही. तसेच पोलिसांनाही सूचना दिली नाही.


(व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा)


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जवळपास एक आठवड्यापूर्वी घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पती, ग्राम प्रदान शेर सिंह आणि त्याच्या मुला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महिलेच्या पतीला संशय होता की त्याच्या पत्नीचे शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत अनैतिक संबंध आहेत. त्यानंतर लोंदा गावातील पंचायतीने महिलेला मारहाण करण्याचे आदेश दिले.


व्हिडिओत दिसत आहे की, महिलेला खूपच वाईट पद्धतीने बेल्टने मारहाण करण्यात येत आहे. महिलेने विरोध करु नये म्हणून तिला झाडाला बांधण्यात आलं होतं. मारहाण होत असलेली महिला किंचाळत होती मात्र, कुणीही तिच्या मदतीला आलं नाही.