नवी दिल्ली : रेल्वे स्थानकांत पाकिटमारांचा सुळसुळाट असतो हे आपल्याला माहिती आहेच. केवळ पाकिटमारच नाही तर महिलांच्या पर्स चोरी करणाऱ्या टोळ्याही आहेत. याच चोरांमुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनवर रविवारी कथित चोरांनी महिलेची पर्स चोरण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान महिला खाली कोसळली आणि तीचा मृत्यू झाला. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक महिलेच्या मुलाने तक्रार दाखल केली आहे की, काही अज्ञातांनी त्याच्या आईची पर्स चोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्या आईने चोरांना विरोध केला. त्याच दरम्यान त्यांचा तोल गेला आणि त्या खाली कोसळल्या.


पीडित महिलेला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तक्रारदार तरुणाने सांगितले की, रात्र असल्यामुळे आरोपींचा चेहरा पाहता आला नाही.


दरम्यान, पोलिसांनी आरोपींचा तपास सुरु केला असून सीसीटीव्ही कॅमे-यांचीही मदत घेण्यात येत आहे.