झारखंडमध्ये एका महिलेची हत्या...
गेल्या काही दिवसांपाससून उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान, मुंबई या भागांमध्ये महिलांची वेणी कापण्याचे प्रकार घडताना दिसून येत आहेत. सुरुवातीला ही भुताटकी असल्याचा संशय लोकांना होता आणि त्याची चांगलीच दहशत देखील पसरली होती.
झारखंड : गेल्या काही दिवसांपाससून उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान, मुंबई या भागांमध्ये महिलांची वेणी कापण्याचे प्रकार घडताना दिसून येत आहेत. सुरुवातीला ही भुताटकी असल्याचा संशय लोकांना होता आणि त्याची चांगलीच दहशत देखील पसरली होती.
पण या सगळ्या मागे नेमकं कोण आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यात वेणी कापणाऱ्या टोळीतील असल्याच्या संशयावरून एका महिलेला जमावाने ठेचून ठार मारल्याची घटना समोर आली आहे. वेणीकापू टोळीचे असल्याच्या संशयावरून शनिवारी तीन जणांवर हल्ला करण्यात आला होता, पण त्यांची सुटका करण्यात यश आलं होत, असं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
पोलिस अधीक्षक पी. मुरुगन यांनी सांगितले, की जमावाने वेणीकापू टोळीतील असल्याच्या संशयावरून काही जणांना ताब्यात घेतले व त्यात एका महिलेचाही समावेश आहे. या सर्वांवर वेणीकापू टोळीतील असल्याचे समजून हल्ला करण्यात आला होता. या वेळी पोलिस घटनास्थळी गेले व त्यांनी तिघांना वाचवले व जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. परंतू, उपचारादरमान्य तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. पण तोपर्यंत या चौघांना गंभीर मारहाण झालेली होती. खरंतर साहिबगंज जिल्हय़ात वेणी कापण्याचा एकही प्रकार घडलेला नसताना हा हल्ला करण्यात आला. वेणी कापण्याच्या केवळ अफवा आहेत असे त्यांनी सांगितले. वेणी कापण्याच्या कथित घटनेच्या संशयावरून महिलेस ठार मारल्याच्या संदर्भात झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
दास यांनी लोकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन केले आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
मारल्या गेलेल्या महिलेच्या १४ वर्षीय मुलाची सरकार काळजी घेईल असे दास यांनी सांगितले. पूर्व सिंगभूम जिल्हय़ात वेणी कापण्याच्या घटना घडल्याच्या अफवा पसरल्याने पोलिसांनी सरपंच व लोक प्रतिनिधींची बैठक घेऊन या बाबत सविस्तर माहिती देत या घटना खोटय़ा असल्याचे सांगितले.