होळीत लपून बसलेल्या महिलेचा होरपळून मृत्यू
देशभरात सर्वत्र होळी आणि धुळवड उत्साहात साजरी होत असताना कानपूरमध्ये एक विचित्र घटना घडल्याचं समोर आलं आहे.
नवी दिल्ली : देशभरात सर्वत्र होळी आणि धुळवड उत्साहात साजरी होत असताना कानपूरमध्ये एक विचित्र घटना घडल्याचं समोर आलं आहे.
धक्कादायक घटना समोर
देशभरात फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळीच्या दिवशी सायंकाळी होळी पेटवतात. ही प्रथा सर्वत्र पहायला मिळते. मात्र, कानपूरमध्ये अशाच प्रकारची होळी पेटवल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला.
होळी पेटल्यानंतर...
कानपूरमध्ये एक ३५ वर्षीय महिला होळीमध्ये लपून बसली होती. या महिलेचा होरपळून मृत्यू झाला आहे. होळी पेटल्यानंतर काही वेळाने घटनास्थळी मानवी हाड दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला.
मृतक महिलेचा पती पुष्पेंद्रने पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी मानसिक रुग्ण होती. या प्रकरणी पोलिसांनी पुष्पेंद्रची चौकशी केली आहे. पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमार्टम केल्यानंतर अवशेष कुटुंबियांना सोपवले आहेत.
अनेक प्रश्न उपस्थित
मृतक सीमाच्या मृत्युनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर मृतक सीमा होळीत लपून बसली होती तर होळी पेटवल्यानंतर ती किंचाळली का नाही? या प्रश्नाचं उत्तर पोलिसांकडेही नाहीये. तसेत सीमाने बाहेर पडण्यासाठी हालचालही का नाही केली?
सासरच्यांनी पाठवलं होतं माहेरी
सीमाचे पती पुष्पेंद्र यांनी पोलिसांना माहिती दिली की, त्याची पत्नी मानसिक रुग्ण होती. त्यामुळे १५ दिवसांपूर्वीच तिला माहेरी पाठवण्यात आलं होतं. होळीच्या दिवशी स्थानिकांना राखेत हाडं दिसली त्याच ठिकाणी सीमाचे कपडेही दिसले.
या घटनेची माहिती मुसानगर पोलिसांना देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. आजुबाजुला मिळालेल्या कपड्यांच्या आधारे सीमाच्या कुटुंबियांनी तिची ओळख पटवली.