एका लग्नाची अनोखी गोष्ट, आरोपी महिलेने न्यायाधीशासोबत बांधली लग्नाची बेडी
राजस्थानात सध्या चर्चा आहे ती एका अनोख्या लग्नाची...
जयपूर : राजस्थानात सध्या चर्चा आहे ती एका लग्नाची... एक आरोपी महिला आणि एका न्यायाधीशानं लग्नगाठ बांधली आहे. राजस्थानच्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेल्या पिंकी मीना यांना लाचखोरीच्या आरोपात अटक झाली. 10 दिवसांच्या अंतरीम जामिनावर असताना मंगळवारी त्यांचा विवाह झाला. विशेष म्हणजे, त्यांचे पती एक न्यायाधीश आहेत. त्यामुळे राजस्थानात या अनोख्या विवाहाची चर्चा आहे.
जयपूर-सीकर मार्गावर राजावास इथल्या रिसॉर्टमध्ये या विवाहसोहळ्याची तयारी करण्यात आली होती. मंगळवारी हा विवाह सोहळा होता. त्यामुळे सोमवारी रात्रीपासूनच रिसॉर्ट सजवण्यात आला होता. मात्र ऐनवेळी कहानी मध्ये ट्विस्ट आला. सोमवारी रात्री 'बारात' पोहोचलीच नाही. काही तुरळक पाहुणे आले असले तरी वधूकडचे व-हाडीही पोहोचले नव्हते. अखेर मंगळवारी सकाळी याचा उलगडा झाला. आरोपी आणि न्यायाधीश विवाहबंधनात अडकत असल्याच्या बातम्या आल्यामुळे एका गावात अत्यंत साधेपणानं पिंकी मीना यांचा विवाह झाला.
मीना यांच्या आमंत्रण पत्रिकेलाही चांगलीच प्रसिद्धी मिळाली. 'इतना ही लो थाली में... व्यर्थ न जाए नाली में...' यासह कोरोनाबाबत जनजागृती करणारे संदेशही नियमंत्रण पत्रिकेवर लिहिण्यात आले होते. आता 21 तारखेला पिंकी मीना यांना कोर्टात सरेंडर करावं लागणार आहे. न्यायाधीशाची लग्न झालं असलं तरी कायद्यातून त्यांची सुटका होण्यासाठी त्यांना निर्दोषत्व सिद्ध करावंच लागेल.