महिलांचा पती आणि सासरच्या संपत्तीवर किती अधिकार? प्रत्येक स्त्रीला माहित असायलाच हवं
Woman Property Rights: महिलांचा पतीच्या आणि सासरच्या संपत्तीवर समान अधिकार असतो का? प्रत्येक स्त्रीला कायदा माहिती असायलाच हवा.
नवी दिल्लीः वडिलांच्या संपत्तीवर मुलाप्रमाणेच मुलींचाही हक्क असतो. 2005च्या घटनादुरुस्तीनंतर मुलीला समान वारस म्हणून गणले गेले आहे. आता मुलीच्या लग्नानंतरही वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा हक्क असतो. मात्र, लग्नानंतर पतीच्या आणि सासरकडील मालमत्तेत महिलेला किती हक्क असतो? पतीच्या मालमत्तेवर पत्नीचा पूर्ण हक्क असतो, असं म्हटलं जातं. मात्र हे पूर्णपणे सत्य नाहीये. प्रत्येक महिलांना याबाबत माहिती असायलाच हवी.
स्त्रिया लग्नानंतर आपल्या आई-वडिलांचे घर सोडून पतीच्या घरी राहायला जातात. असं म्हणायला गेलं तर ते त्यांचेही घर असते मात्र त्या घरावर विवाहित महिलेचा हक्क किती असतो असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. त्यामुळं आज जाणून घेऊया महिलांचा पती आणि सासरच्या संपत्तीत किती हक्क असतो. पतीच्या संपत्तीवर पत्नीचा पूर्णपणे अधिकार नसतो. या संपत्तीवर पत्नीसोबतच घरातील इतर कुटुंबीयही हक्क सांगू शकतात.
जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या स्वकमाईवर संपत्ती बनवली असेल. त्या मालमत्तेवर पत्नीसोबतच आई आणि मुलांचाही अधिकार असतो. जर, एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र बनवले असेल तर त्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनींना या संपत्तीवर अधिकार मिळतो. यात नॉमिनी त्याची पत्नीही असू शकते. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र बनवले नसेल तर त्याच्या संपत्तीत पत्नीसोबतच आई आणि मुलांनाही समान अधिकार मिळतो.
जर एखाद्या महिलेच्या पतीचा मृत्यू झालास तर पतीच्या वडिलांच्या संपत्तीवर त्या महिलेचा अधिकार नसू शकतो. पतीच्या मृत्यूनंतर महिलेला सासरचे घराबाहेर काढू शकत नाही तरीही तिच्या वडिलोपार्जित संपत्तीत कोणताही अधिकार मिळत नाही. जर, त्या महिलेला मुलं असतील तर त्यांना वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार मिळू शकतो.
घटस्फोट झाल्यानंतर महिलेला संपत्तीत अधिकार मिळतो का?
जर एखाद्या महिलेने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला असेल तर ती तिच्या पतीकडून पोटगी मागू शकते. ही पोटगी पती-पत्नी दोघांच्या आर्थिक स्थितीच्या आधारावर ठरवले जाते. घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये महिन्याचा देखभाला व्यतिरिक्त, एक वेळ सेटलमेंटचा पर्याय देखील उपलब्ध आहे. घटस्फोटानंतर मुलं आईसोबत राहत असतील, तर त्यांच्याही पालनपोषणाचा खर्च नवऱ्याला करावा लागेल. घटस्फोट झाल्यास पतीच्या संपत्तीवर पत्नीचा अधिकार नसतो. मात्र, संपत्तीवर महिलेच्या मुलांचा पूर्ण हक्क आहे. दुसरीकडे, जर पती-पत्नीची अशी कोणतीही मालमत्ता असेल ज्यामध्ये ते दोघेही मालक असतील, तर ती समान प्रमाणात विभागली जाते.