`ही` १३ वर्षांची मुलगी चक्क ८ भाषा बोलते...
साधारणपणे शाळेत असताना इंग्रजी हा विषय अनेकांना कठीण वाटतो.
मुंबई : साधारणपणे शाळेत असताना इंग्रजी हा विषय अनेकांना कठीण वाटतो. मोठमोठाली माणसे देखील इंग्रजीत बोलताना अडखळतात. बरेचदा इंग्रजी न येण्यामुळे अपमानाला सामोरे जावे लागते. तर काही वेळा आत्मविश्वास कमी होतो. ही परिस्थिती भारतातील अनेकांची. शहरात राहणाऱ्या कित्येक लोकांना इंग्रजीची समस्या भेडसावते. मात्र हरियाणामधल्या एका छोट्याश्या गावातून आलेली एक मुलगी अत्यंत अस्खलित इंग्रजी बोलते. तिचं नाव जान्हवी. तिला ‘वंडर गर्ल जान्हवी’ म्हणून ओळखले जाते.
तिचे इंग्रजीतील उच्चार अगदी ब्रिटिशांसारखे आहेत. आपल्या बोलण्याने तिने अनेकांना प्रभावित केले आहे. काही दिवसांपूर्वी परदेशी पर्यटकांशी तिने इंग्रजीत संवाद साधला. तिचे भाषेचे ज्ञान आणि संवाद कौशल्य पाहून पर्यटक देखील भारावून गेले. इतकंच नाही तर ती ८ वेगवेगळ्या भाषा बोलते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती फक्त १३ वर्षांची आहे.
जान्हवी मूळची मराठी असून लहानपणापासून तिचे वडील तिला इंग्रजी शिकवतात. त्यामुळे तिला त्या भाषेची गोडी लागली. आणि ती आवड जोपासण्यासाठी ती टीव्हीवरचे इंग्रजी कार्यक्रम, बातमीपत्र ऐकू लागली आणि त्यातूनच तिचे उच्चार सुधारले. इंग्रजी सोबतच ती जपानी, फ्रेंच यांसारख्या भाषा देखील शिकली. विशेष म्हणजे फक्त व्हिडिओ आणि टीव्ही पाहून तिने ही भाषा आत्मसात केली आहे. तिचे व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.