नवी दिल्ली : जगात स्वच्छ पेट्रोल आणि डिझेल देणाऱ्या देशांच्या यादीत भारताने स्थान मिळवलं आहे. कोणत्याही प्रकारच्या किंमती न वाढवता किंवा सेवेत बदल न करता अशा पेट्रोल-डिझेलची पूर्तता सुरु केली आहे. यामुळे शहरांमधील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतर देशांच्या तुलनेत भारत स्टेज-चार ग्रेड इंधन स्थानावरुन थेट स्टेज सहा ग्रेड इंधनाच्या स्थानी उपलब्ध होणार आहे. हे स्थान यूरो-सहा ग्रेड इंधनाच्या समान आहे. यामुळे पेट्रोलच्या दरात एक रुपयाने वाढ होणे अपेक्षित होते. पण इंधन कंपन्यांनी दर न वाढवता स्वच्छ इंधन देण्यास सुरुवात केली आहे. 



आज आम्ही शंभर टक्के बीएस-सहा पेट्रोल, डिझेलची पूर्तता करत आहोत.देशातील आमच्या सर्व ६८,७०० पेट्रोल पंपांवर आजपासून स्वच्छ इंधनाची विक्री सुरु होत असल्याचे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडचे संस्थापक संजीव सिंह यांनी सांगितले. असे असले तरीही इंधनाच्या किंमतीत कोणतेच बदल न झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 


देशामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत १६ मार्चला बदल झाला होता.तेव्हापासून दिल्लीत पेट्रोल प्रति लीटर ६९.५९ रुपये प्रति लीटर तर डिझेल ६२.२९ रुपये प्रति लीटर दरात मिळत आहे. कंपनीच्या रिफायनरींनी जानेवारीपासूनच नव्या ग्रेडचे उत्पादन सुरु केले आहे. त्यानंतर कंपनीच्या पेट्रोल पंपांवर नव्या इंधन विक्रीस सुरुवात झाल्याचे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष एम.के सुराणा यांनी सांगितले.