चंदीगढ: गुरुदासपूर मतदारसंघातून काँग्रेसचे सुनील जाखर उभे राहणार माहिती असते तर मी सनीला निवडणुकीला उभेच राहू दिले नसते, असे वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी केले. त्यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, सुनील जाखर यांचे वडील बलराम जाखर मला भावासारखे होते. त्यामुळे जर त्यांचा मुलगा गुरूदासपूरमधून निवडणूक लढवत आहे, हे माहिती असते तर मी सनीला रिंगणात उतरूच दिले नसते. सनी हा बॉलिवूड इंडस्ट्रीतून आला आहे. त्यामुळे तो इतक्या अनुभवी राजकारण्याशी लढू शकत नाही, असे धर्मेंद्र यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, आम्ही याठिकाणी कोणाशी भांडण्यासाठी आलेलो नाही. येथील भूमीवर आमचे प्रेम असल्यामुळे येथील जनतेच्या समस्या आम्हाला जाणून घ्यायच्या असल्याचेही धर्मेंद्र यांनी सांगितले.


दरम्यान, गुरुदासपूर मतदारसंघातील प्रचारात सनीला लोकांकडून भरभरून प्रेम मिळत असल्याबद्दलही धर्मेंद्र यांनी आनंद व्यक्त केला. मी मुंबईतील घरात बसून सनीचे रोड शो पाहिले. त्यावेळी मोठ्या संख्येने जमलेले लोक पाहून मला भरून आले. लोक आमच्या कुटुंबावर प्रेम करतात हे मला माहिती होते. मात्र, प्रत्यक्षात त्याची प्रचिती आल्याने मला खूप आश्चर्य वाटत असल्याचेही धर्मेंद्र यांनी म्हटले. धर्मेंद्र यांनी सोमवारी गुरुदासपूरमध्ये सनीसाठी प्रचारही केला.


सुनील जाखर हे गुरुदारसपूरचे विद्यमान खासदार आहेत. विनोद खन्ना यांच्या निधनानंतर २०१७ साली झालेल्या पोटनिवडणुकीत सुनील जाखर यांनी ही जागा जिंकली होती. गुरुदासपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. १९९८ साली विनोद खन्ना यांनी या मतदारसंघात पहिल्यांदा विजय मिळवला होता. येत्या १९ तारखेला याठिकाणी मतदान होणार आहे.