टी-शर्ट काढला, स्तनांना, पोटाला स्पर्श केला अन्... ब्रृजभूषण सिंहाविरोधात कुस्तीपटूंच्या गंभीर तक्रारी
Wrestlers Protest : महिन्याभरापासून सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोनलाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरुय. पोलिसांनी हुसकावल्यानंतरही कुस्तीपटू आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. अशातच दिल्ली पोलिसांनी ब्रृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात नोंदवलेल्या गुन्ह्यातील तक्रारी समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Wrestlers Protest : गेल्या 36 दिवसांपासून भारतीय कुस्तीपटू सहकाऱ्यांवर झालेल्या लैंगिक छळाच्या तक्रारीच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. नव्या संसद भवनाच्या लोकार्पणाच्या दिवशीच दिल्ली पोलिसांकडून कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडण्याचा देखील प्रयत्न झाला. अशातच आता भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह (brij bhushan sharan singh) यांच्या विरोधात दाखल केलेल्या दोन्ही तक्रारी आता समोर आल्या आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, ब्रृजभूषण सिंह आणि सचिव विनोद तोमर यात मुख्य आरोपी आहेत. एफआयआरनुसार, ब्रृजभूषण यांनी कुस्तीपटूंचा अनेकदा विनयभंग केल्याचा आरोप आहे. यामध्ये कुस्तीपटूंना अयोग्यरित्या स्पर्श केल्याचे देखील म्हटलं आहे. श्वास तपासण्याच्या बहाण्याने महिला कुस्तीपटूंना टी-शर्टही काढायला सांगितल्याचे या तक्रारींमध्ये म्हटलं आहे.
ब्रृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन आणखी तीव्र होताना दिसत आहे. 28 एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी त्यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांमध्ये मदतीच्या बदल्यात लैंगिक संबंधाची मागणी करणे, लैंगिक छळाच्या 15 पैकी 10 घटनांमध्ये शरीराला अयोग्यरित्या स्पर्श करणे, स्तनांवर हात लावणे, पोटाला स्पर्श करणे इत्यादी गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
दोन्ही एफआयआरमध्ये आयपीसी कलम 354, 354A, 354D आणि 34 यांचा समावेश आहे. या कलमांनुसार एक ते तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतुद आहे. पहिल्या एफआयआरमध्ये सहा कुस्तीपटूंनी आरोप केले आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांचेही नाव आरोपींमध्ये आहे. तर दुसऱ्या एफआयरमध्ये अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आरोप केले आहेत. पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम 10 अंतर्गत या प्रकणानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये दोषी आढळल्यास पाच ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. एफआयआरमध्ये नोंदवलेल्या घटना 2012 ते 2022 दरम्यानच्या असून त्या भारतात आणि परदेशात घडल्याचे म्हटलं आहे.
दरम्यान, शेतकरी संघटनांनी गुरुवारी उत्तर प्रदेशमध्ये ‘खाप महापंचायत’ आणि पंजाब आणि हरियाणामध्ये निषेध करत आंदोलक कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील सोराम गावातील मंडळीत, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले की याप्रकरणी आम्ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार आहोतआणि आंदोलनाच्या पुढील चरणांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी हरियाणाच्या कुरुक्षेत्रात आणखी एक महापंचायत आयोजित केली जाईल.
दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत ब्रृजभूषण सिंह यांना तुरुंगात टाकण्याची मागणी असलेल्या कुस्तीपटूंना पाठिंबा दिला. मात्र, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सरकार हा मुद्दा संवेदनशीलतेने हाताळत असल्याचे सांगितले आणि कुस्तीपटूंच्या पूर्वीच्या मागण्या मान्य केल्या.