नवी दिल्ली - तरुणांमध्ये सध्या गुगल पेची जोरदार चर्चा असते. अनेकांकडून आर्थिक व्यवहारांसाठी गुगल पेचा वापरही केला जातो. विविध स्क्रॅच कुपनमुळे अनेकांना पैसे दिल्यावर छोटासा आर्थिक मोबदलाही मिळतो. पण आता गुगल पेला टक्कर देण्यासाठी चीनमधील कंपनी शिओमी एमआय पे घेऊन येत आहे. आयसीआयसीआय बॅंक आणि पेयू यांच्या साह्याने एमआय पे काम करणार आहे. या माध्यमातून मोबाईल वापरणाऱ्यांना एमआय पेच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करता येतील. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, युपीआय आणि इंटरनेट बॅंकिंग या माध्यमातून हे व्यवहार पूर्ण करता येतील. गुगल पे प्रमाणेच एमआय पेच्या माध्यमातून ग्राहक विविध बिलेही चुकती करू शकणार आहेत. त्याचबरोबर मोबाईल, डीटीएच सेवा यांचे रिचार्जही करू शकणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमआय पे सध्या बीटा स्वरुपात उपलब्ध असेल. या पद्धतीमध्ये टेस्टिंग पूर्ण केल्यावरच त्याचे पूर्ण रूप मोबाईलधारकांना उपलब्ध करून दिले जाईल. कंपनीने यासाठी बीटा टेस्टर यांना हे अॅप डाऊनलोड करून त्याद्वारे व्यवहार करण्याची विनंतीही केली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एमआय पे द्वारे मोठ्या प्रमाणातील ग्राहकांना आर्थिक व्यवहार करू देण्याची परवानगी दिल्यामुळे बीटा टेस्टिंग सुरू करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले. 


ही सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर भारतातील सर्व आघाडीच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डांच्या साह्याने आर्थिक व्यवहार करू दिले जाणार आहेत. एमआय पेच्या माध्यमातून मोबाईलमधील काँटॅक्ट्समध्ये असलेल्या विविध मोबाईलधारकांपर्यंत जलदगतीने पैसे पाठवणेही शक्य होणार आहे. या माध्यमातून ग्राहकांकडून उपलब्ध झालेला सर्व डेटा अत्यंत सुरक्षितपणे ठेवला जाईल, याचीही शाश्वती कंपनीने दिली आहे. 


एमआय पे कसे सुरू करायचे?
एमआय पे अॅप सुरू करा
बॅंकेची निवड करा
बॅंकेची माहिती भरा
एसएमएस व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून बॅंक अकाऊंट लिंक करा.