YES बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, सर्व सेवा १८ मार्चपासून सुरु होणार
येस बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा
नवी दिल्ली : येस बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्राहकांच्या अडचणी 18 मार्च संध्याकाळी 6 वाजेपासून दूर होणार आहेत. अर्थमंत्रालयाने बँकवर असलेला 3 एप्रिल पर्यंतचा मोराटोरियम 18 मार्चला हटवण्यात येईल असं आधीच स्पष्ट केलं आहे. आता येस बँकने देखील ट्विट करत याला दुजोरा दिला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. येस बँकेने म्हटलं की, '18 मार्चपासून संध्याकाळी 6 ला बँकेच्या सर्व सेवा सुरळीतपणे सुरु होणार आहेत.'
19 मार्चपासून ग्राहकांना बँकेच्या सर्व सेवा मिळणार आहेत. 50 हजार रुपयापेक्षा अधिकची रक्कम देखील ग्राहकांना काढता येणार आहे. बँकेने ट्विट करत म्हटलं की, ग्राहक आमच्या 1132 शाखांपैकी कोणत्याही शाखेत निराश होणार नाहीत. याशिवाय डिजिटल सेवा आणि प्लॅटफॉर्म्सवर देखील निराश होणार नाही.
आज बँकांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. बँक शेअर 58 टक्क्यांनी वाढले. 13 मार्चला अर्थ मंत्रालयाने येस बँकेच्या पुनर्गठन योजनेवर नोटिफिकेशन जारी करत म्हटलं होतं की, 5 मार्चला बँकेवर लावण्यात आलेले निर्बंध 18 मार्चला हटवण्यात येतील.