नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या आधी भारत सरकारकडून पद्म पुरस्कार आणि देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची म्हणजेच भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली. पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर होताच त्याविषयीच्या बऱ्याच चर्चांनी जोर धरला. ज्यामध्ये योगगुरू बाबा रामदेव यांनी एक लक्षवेधी वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. पुढच्या वर्षी तरी केंद्र सरकारने एखाद्या संन्यासी, संत व्यक्तीला भारतरत्नने सन्मानित कारावं अशी मागणी त्यांनी केली. यंदाच्या वर्षी भारतरत्नसाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, दिवंगत सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख आणि दिवंगत गायक भूपेन हजारिका यांची निवड करण्यात आली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं. '७० वर्षांमध्ये एकाही संन्यासी व्यक्तीला भारतरत्नने सन्मानित करण्यात आलेलं नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. महर्षी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद किंवा मग शिवकुमार स्वामी यांना कोणालाही हा पुरस्कार मिळालेला नाही', ही बाब त्यांनी अधोरेखित केली. सोबतच पुढच्या वेळी भारत सरकारने कमीत कमी एका संन्यासी व्यक्तीची भारतरत्नसाठी निवड करावी अशी मागणीही केली. 



देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराच्या मुद्द्यावरुन यंदा बऱ्याच चर्चा आणि वाद रंगल्याचं पाहायला मिळालं. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री जी.परमेश्वर यांनी कर्नाटकातील तुमकुरू येथील सिद्धगंगा मठ प्रमुख डॉ. शिवकुमार स्वामी यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी केली. पण, त्यांच्या या मागणीकडेही दुर्लक्ष झालं. त्यामुळे भारतरत्नच्या मुद्द्यावरुननही अनेक चर्चांनी जोर धरला.