`पूर्वजन्मी रिलेशनमध्ये` असल्याचं सांगून NRI महिलेवर योग प्रशिक्षकाचा बलात्कार; गरोदर राहिली पण..
Yoga Teacher Rape US NRI Women: या प्रकरणामध्ये पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये तिने नेमका घटनाक्रम काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे.
Yoga Teacher Rape US NRI Women: कर्नाटकमधील चिकमंगळुरु जिल्ह्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका योग प्रशिक्षकाला बलात्कार प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. रविवारी एका अनिवासी भारतीय महिलेने या योग प्रशिक्षकाने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर ही अटक करण्यात आली. पूर्वीच्या जन्मी आपण एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होतो असं सांगून या योग प्रशिक्षकाने आपल्यावर बलात्कार केल्याचं या पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.
कोण आहे आरोपी?
पोलिसांनी अटक केलेल्या योग प्रशिक्षकाचं नाव प्रदीप उल्लाल असं असून तो 54 वर्षांचा आहे. चिक्कमंगळुरुमध्ये प्रदीप केवला फाऊंडेशन नावाची संस्था चालवतो, असं 'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर उल्लाला पोलिसांनी अटक केली. पीडित महिला उल्लालच्या ऑनलाइन योग अभ्यास वर्गातील सदस्या असल्याची माहिती समोर येत आहे.
तीन वेळा झाली प्रत्यक्ष भेट
पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, तिचे कुटुंब मुळचे पंजाबचे आहे. 2000 सालापासून ती तिच्या कुटुंबाबरोबर अमेरिकेतील कॅलिफॉर्निया येथे वास्तव्यास आहे. पीडितेने 2021 आणि 2022 दरम्यान आपण 3 वेळा उल्लाल यांच्या प्रशिक्षण केंद्राला प्रत्यक्षात भेट दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. याच भेटीदरम्यान योग प्रशिक्षकाने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं पीडितेचं म्हणणं आहे.
गरोदर राहिले मात्र...
आपण दोघे आधीच्या जन्मी रिलेशनमध्ये होतो यावर उल्लालने मला विश्वास ठेवण्यास भाग पाडलं असं पीडितेने म्हटलं आहे. तो माझ्याशी 'अध्यात्म, कामातील ऊर्जा आणि दैवी प्रेमाबद्दल' बोलला, त्यानंतर त्याने माझ्यावर लैंगिक अथ्याचार केले, असं पीडितेने तक्रारीत नमूद केलं आहे. या शरीरसंबंधांमधून मी गरोदर राहिले. मात्र माझा गर्भपात झाला, असा आरोप या महिलेने केला आहे.
या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल
चिकमंगळुरु ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणामध्ये कलम 376 (2)(एन) अंतर्गत गुन्हा दाखल करुन घेतला आहे. वारंवार एकाच महिलेचा बलात्कार करण्यासंदर्भातील हे कलम आहे.
पोलीस म्हणतात, तो दुबईत राहायचा
"उल्लाल हा बंगळुरुमध्ये वास्तव्यास आहे. पूर्वी तो दुबईमध्ये काम करायचा. दुबईमधील वास्तव्यादरम्यान त्याने योग अभ्यास वर्ग घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो भारतात परतला. त्याने 2010 मध्ये तीन एकर जमीन विकत घेऊन चिकमंगळुरुमध्ये योग अभ्यास वर्ग सुरु केले," असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. "उल्लाल लोकांना हिमालयामध्ये सहलीसाठी घेऊन जायचा. तो पक्षीनिरिक्षणाच्या नावाखालीही लोकांना सहलीला न्यायाचा. तो प्रामुख्याने ऑनलाइन माध्यमातून काम करातो आणि त्याच्या विद्यार्थ्यांची संख्या शेकडोंमध्ये आहे," असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.