Yogi Adityanth 2.0 : योगी सरकारच्या बुलडोझरच्या  (Bulldozer) भीतीने  उत्तर प्रदेशमध्ये दोन आठवड्यात 50 हून अधिक गुन्हेगारांनी आत्मसमर्पण (surrendered) केलं आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. तसंच राज्याच्या विविध भागात अनेक बेकायदा अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक फरार गुन्हेगारांचे काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यात ते पोलिस स्थानकात असून त्यांच्या गळ्यात पाट्या लटकवण्यात आहेत. त्यामध्ये 'मी आत्मसमर्पण करत आहे, कृपया मला गोळी मारू नका' असं लिहिलं आहे.


अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पंधरवड्यात 50 हून अधिक गुन्हेगारांनी केवळ आत्मसमर्पण केलं नाही, तर गुन्हेगारीपासून दूर राहण्याचा संकल्पही केला आहे. गुन्हेगार आणि माफियांविरोधात कठोर कारवाईचे प्रतीक बनलेल्या बुलडोझरला योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी संपूर्ण यूपी निवडणुकीत 'बुलडोजर बाबा' असं नाव दिलं आहे.


अपहरण आणि वसुलीच्या आरोपींचं आत्मसमर्पण
अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितलं की, चकमकीत दोन गुन्हेगार मारले गेले आणि या काळात अनेकांना अटक करण्यात आली आहे. अतिक्रमणं हटविण्यासाठी आणि बेकायदा मालमत्ता पाडण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी बुलडोझर तैनात करण्यात आले आहेत. 


गुन्ह्यांपासून दूर राहण्याचे आश्वासन 
सहारनपूर जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात, कधीही गुन्हा करणार नाही असं आश्वासन देऊन सुमारे दोन डझन गुन्हेगार आत्मसमर्पन करण्यासाठी रांगेत उभे होते. यानंतर देवबंदमध्ये 4 दारू तस्करांच्या आत्मसमर्पणाची बातमी आहे. गेल्या आठवड्यात प्रतापगडमधील एका बलात्कारातील आरोपीने रेल्वे स्थानकाजवळील शौचालयात एका महिलेवर बलात्कार केल्यानंतर चार दिवसांनी आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी त्याच्या घरासमोर बुलडोझर लावला होता.


औरैया, मैनपुरी आणि लखनौमध्येही बुलडोझरची दहशत
औरैया जिल्हा प्रशासनाने सोमवारी बाजारातील सरकारी जागेवर बेकायदेशीरपणे बांधलेली दुकाने हटवली. तसंच होळीच्या पूर्वसंध्येला प्रशासनाने मैनपुरी येथील अतिक्रमित जागेवरील दुकाने हटवली. गुन्हेगार आणि माफियांबद्दल कोणतीही हयगय दाखवू नये, अशी सूचना पोलिसांना देण्यात आली आहे. 


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार 7 हजार 752 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे. अतिरिक्त मुख्य सचिव गृह अवनीश कुमार अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रांचा गैरवापर केल्याप्रकरणी एक हजाराहून अधिक लोकांचे परवानेही निलंबित करण्यात येत आहेत. दुसरीकडे, शांतता भंग केल्याप्रकरणी 2 लाख 32 हजार 971 प्रकरणांमध्ये 11 लाख 99 हजार 828 जणांवर बंदी घालण्यात आली आहे. यावर्षी आतापर्यंत 1439 शस्त्र परवाने निलंबित करण्यात आले आहेत.